भिवंडीत घडतायत चेन स्नॅचिंगच्या घटना

भिवंडी : भिवंडी शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शहरात दागिने चोरटे सक्रिय झाले असून अजयनगर पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर पादचाऱ्याच्या गळ्यातील चेन चोरल्याची घटना घडली आहे.

भिवंडी : भिवंडी शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शहरात दागिने चोरटे सक्रिय झाले असून अजयनगर पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर पादचाऱ्याच्या गळ्यातील चेन चोरल्याची घटना घडली आहे. शहरातील ब्राह्मण आळीत राहणारे रहिवासी संजय मिश्रा  हे नेहमीप्रमाणे आपल्या घरातून सकाळी सहा वाजताच्या सुमारास मॉर्निंग वॉककरिता आदर्शपार्क येथील आर.आर.गार्डनमध्ये जात होते. त्यावेळी त्यांच्या पाळतीवर असलेल्या दुचाकीस्वारांनी मिश्रा यांना अजयनगर रोडवर गाठले व त्यांच्या मानेवर फटका मारून मागे बसलेल्या स्वाराने शर्टाची कॉलर खेचली आणि मिश्रा यांच्या गळ्यातील चाळीस हजाराची सोन्याची चैन खेचून चोरटे धूम पळून गेले. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात संजय मिश्रा यांनी तक्रार दाखल केली आहे. ही घटना घडली तेव्हा जवळच असलेल्या पोलीस चौकीत पोलीस उपस्थित नव्हते, अशी माहिती मिश्रा यांनी दिली.या घटनेमुळे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिला व पुरुषांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अजयनगर व आदर्शापार्क या ठिकाणी प्रदूषणमुक्त वातावरण असल्याने लॉक डाऊनपूर्वी दररोज सकाळ-संध्याकाळ शेेकडोंच्या संख्येने महिला ,पुरुष येतात. अशा ठिकाणी चेनस्नॅचिंग होऊ नये म्हणून पोलिसांनीं या परिसरात गस्त वाढवावी आणि चोरांना जेरबंद करावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाकडून केली जात आहे.