४ महिने गावच्या आठवणीत रमलेले चाकरमानी परतीच्या वेळी झाले भावुक!

चाकरमान्यांकडून गावातील मुलांचे झाले प्रबोधन

महाड : कोरोनाचे संक्रमण काळात आपला जीव वाचवण्यासाठी कुटुंबासह गावी आलेले चाकरमनी गावच्या आठवणीत व वातावरणात पुर्णतः रमून गेले. सुरुवातीस शासकिय निर्देशामुळे त्यांना गावी येण्यास मनाई करणारे ग्रामस्थही कोरोनाची सुरुवातीस असणारी भिती नाहीशी झाल्याने या चाकरमन्यावर पुर्वीप्रमाणेच जीव लावू लागले.

गावी आलेल्या चाकरमान्यांनीही मोठमोठ्या शहरात राहून आत्मसात केलेल्या ज्ञानाचा फायदा या टाळेबंदीचे काळात गावातील छोटी मुले ,तरुणाई व ग्रामस्थांना करुन देत त्यांचे चांगल्या प्रकारे प्रबोधन केले. या चार महिन्याचे काळात गावची साफ सफाई, शाळा दुरुस्ती, बंधारे दुरुस्ती व सफाई, शेती कामास मदत चाकरमान्यांनी केली. गणेशोत्सव संपत आल्याने पुन्हा आपल्या कामा धंद्याच्या ठिकाणी जाण्याचे वेध लागलेले हे चाकरमानी आता आपल्या आप्तांसह ग्रामस्थांच्या निरोपाच्या भेटी घेऊ लागले आहेत. गेली चार महिने गावाशी एकरूप होऊन जुन्या आठवणीत रमून गेलेले चाकरमानी आणि ग्रामस्थही भावुक झाल्याचे वातावरण गावो गावी पहायला मिळत आहे.
महाड तालुक्यातील राजीवली या गावी मुंबई पुण्यासह अन्य शहरातून ४० एक कुटुंब टाळेबंदीच्या काळात आले आहेत. सुरुवातीचे काळात सुमारे महिनाभर आपल्या बंद घरात अथवा गावच्या शाळेमध्ये अलग राहील्यानंतर पुढच्या काळात गावकऱ्यांमध्ये मिळून मिसळून राहून सर्व कामामध्ये सहभागी होत हे चाकरमानी आपल्या मुलाबाळांसह गावच्या जुन्या आठवणीत रममाण झाले. ग्राम स्वच्छता, बंधारे दुरुस्ती, शेतीकामात ग्रामस्थांना या चाकरमान्यांची चांगली मदत झाली.

राजीवलीच्या मुंबई मधील जय हनुमान चॅरिटेबल ट्रस्टचे सक्रीय कार्यकर्ते वारकरी पंथा तील असल्याने मुंबईत वेगवेगळ्या भागात राहात असले तरी आठवड्यातून अथवा पंधरा दिवसातून एकत्र येऊन भजन, किर्तन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम राबवीत असत . गणेशोत्सवामध्ये मुंबईतील दहा बाय दहाच्या खोलीत दाटीवाटीने जीवन जगणाऱ्या मध्यम व वयोवृद्ध महिलांनी गावी झिम्मा फुगडी जाखडी नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. टाळेबंदीच्या काळात रोज पहाटे काकड आरती, हरिपाठ ,भजन आदी धार्मिक कार्यक्रम ते तीन चार महिन्याच्या काळात गावातील तरुणाई वयोवृद्ध व छोट्या मुलांना सोबत घेऊन राबवू लागले .त्याच बरोबर उच्च शिक्षित असणारे चाकरमानी या काळात गावातील विद्यार्थी कॉलेज युवक यांचे प्रबोधन करू लागले.

यामध्ये हभप रामचंद्र खांबे, हभप राजेश मांडवकर, मुरलीधर बुरटे ,राजेश बुरटे ,प्रमोद जगदाळे, विनोद जगदाळे, मुकुंद मांडवकर, शुभम जगदाळे यांनी विशेष मेहनत घेतली. मुंबई पुण्या सारख्या मोठ्या शहरांमध्ये कामा धंद्या निमित्त्त राहात असलो तरी आमची नाळ कायम गावाशी जोडली आहे. गावाची प्रगती हेच आमचे ध्येय आहे अशी प्रतिकिया हभप राजेश मांडवकर यांनी दिली. या टाळेबंदीच्या काळात आम्ही मुंबईकर मंडळी गावाशी आधिक आत्मियतेने जोडलो गेलो असे हभप रामचंद्र खांबे यांनी सांगितले