टीडीसी बँकेवर परिवर्तन? बुधवारी मतमोजणी; निवडणुकीत ८५ टक्के मतदान

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत सरासरी ८५ टक्के मतदान झाले. कोरोनाचे संकट असतानाही नियमांचे पालन करीत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली, मतदारांनी मोठया प्रमाणात मतदानात सहभाग घेतला.

  ठाणे (Thane).  ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत सरासरी ८५ टक्के मतदान झाले. कोरोनाचे संकट असतानाही नियमांचे पालन करीत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली, मतदारांनी मोठया प्रमाणात मतदानात सहभाग घेतला. या निवडणुकीसाठी सहकार पॅनल आणि महाविकास परिवर्तन पॅनेल असा सामना रंगला आहे.

  बुधवार ३१ मार्च रेाजी मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडी निवडणुकीत प्रथमच उतरली आहे त्यामुळे टिडीसी बँकेवर परिवर्तन होणार का ? हे आता निकालानंतरच स्पष्ट हेाणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा बँकांमध्ये श्रीमंत बँक म्हणून टिडीसी बँकेची ओळख आहे. बँकेच्या २१ संचालकांपैकी ६ संचालकांची बिनविरोध निवड झाल्याने १५ जागांसाठी मंगळवारी निवडणूक पार पडली. १५ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात होते. ठाणे व पालघर जिल्हयात एकूण १८ मतदान केंद्रावर मतदान पार पडले. एकूण ३०६२ मतदार होते.

  ठाणे व पालघर जिल्हयातील १८ मतदान केंद्रावर मतदान पार पडले. कोरोनाचे संकट असतानाही मतदारांनी मतदानात मोठया संख्येने सहभाग घेतला. गेल्या महिनाभरापासून प्रचाराच्या रणधुमाळी सुरू होती. शिवसेना- काँग्रेस -राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे परिवर्तन पॅनल विरूध्द बहुजन विकास आघाडी- भाजप चे सहकार पॅनल असा अटीतटीचा सामना रंगला आहे. सहकार पॅनलला घवघवीत यश मिळणार असल्याचा दावा माजी संचालक राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.

  दुसरीकडे टिडीसी बँकेवर परिवर्तन होणार असा विश्वास समन्वयक असलेले शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे परिवर्तन पॅनलची निवडणूक पार पडली. त्यामुळे निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

  मतदान केंद्रावर किती टक्के मतदान
  अंबरनाथ ९४ टक्के, भिवंडी ९९ टक्के, डहाणू ९८ टक्के, जव्हार ९७ टक्के, कल्याण डोंबिवली ८६ टक्के, मोखाडा ९३ टक्के, मुरबाड ९९ टक्के, पालघर ९५ टक्के, शहापूर ९८ टक्के, तलासरी ८९ टक्के, ठाणे ९५ टक्के, ठाणे शहर ८० टक्के, उल्हासनगर ९२ टक्के, वसई बूथ १ ८७ टक्के, वसई बूथ २ ८९ टक्के, वसई बूथ३ ८९ टक्के, विक्रमगड ९४ टक्के, वाडा ९९ टक्के मतदान पार पडले.