corona hospital

सिडकोतर्फे(covid health center of cidco)  नवी मुंबईतील कळंबोली येथे ८०० व मुंबईतील कांजूरमार्ग येथे २००० खाटांचे सुसज्ज समर्पित कोविड आरोग्य केंद्र(covid health center at kanjurmarg and kalamboli) उभारण्यात येणार आहे.

  नवी मुंबई : मुंबई व नवी मुंबईमध्ये होत असलेली कोरोना रुग्णांची वाढ लक्षात घेऊन, अधिकाधिक रुग्णांवर तातडीने व प्रभावी उपचार करता यावेत याकरिता महाराष्ट्र शासनाच्या निर्देशांनुसार सिडकोतर्फे(covid health center of cidco)  नवी मुंबईतील कळंबोली येथे ८०० व मुंबईतील कांजूरमार्ग येथे २००० खाटांचे सुसज्ज समर्पित कोविड आरोग्य केंद्र(covid health center at kanjurmarg and kalamboli) उभारण्यात येणार आहे.

  कळंबोली केंद्रातील ८०० खाटांपैकी ६९० खाटा या ऑक्सिजनयुक्त तर ११० खाटा या अतिदक्षता विभागाकरिता असणार आहेत. कांजूरमार्ग केंद्रातील २,००० खाटांपैकी १,४०० खाटा या ऑक्सिजनयुक्त, ४०० खाटा ऑक्सिजनविरहित व २०० खाटा या अतिदक्षता विभागाकरिता असणार आहेत.

  कोरोना महासाथीमुळे रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आपल्या हद्दीत सिडकोमार्फत अतिरिक्त कोविड केंद्रे उभारण्यात यावीत, अशी विनंती अनुक्रमे पनवेल आणि बृहन्मुंबई महापालिकांकडून राज्य शासनाला करण्यात आली होती. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येला तातडीने व प्रभावी उपचार पुरविण्याकरिता मुंबई आणि नवी मुंबईतील अधिकाधिक कोरोना रुग्णांवर उपचार करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने सिडकोला नवी मुंबईतील कळंबोली आणि मुंबईतील कांजूरमार्ग येथे समर्पित कोविड केंद्र उभारण्याचे निर्देश दिले आहेत.

  त्यानुसार सिडकोकडून कळंबोली येथील भारतीय कापूस महामंडळाच्या गोदामामध्ये ८०० खाटांचे तर कांजूरमार्ग येथे २,००० खाटांचे कोविड केंद्र लवकरच उभारण्यात येणार असून त्यासाठीच्या प्रारंभिक कामांना सुरुवात झाली आहे.

  कळंबोली येथील केंद्र उभारण्यात आल्यानंतर पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. कळंबोली येथील केंद्र नॉन इनव्हेझिव्ह व्हेन्टिलेशन सुविधेने युक्त असणार आहे. कांजूरमार्ग केंद्रातील ७०% खाटा या ऑक्सिजनयुक्त तर २०० खाटा अतिदक्षता विभागाकरिता राखीव असणार आहेत.

  मुंबई आणि नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सिडकोतर्फे राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली आणि कांजूरमार्ग येथे लवकरच समर्पित कोविड केंद्रे उभारण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला सिडको सर्वतोपरीने सहाय्य करत आहे. यापुढेही करत राहिल. समर्पित कोविड केंद्रे उभारण्यात आल्यानंतर संबंधित महानगरपालिकांना त्यांचे हस्तांतरण करण्यात येईल.

  - डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

  या कोविड केंद्रांची उभारणी राज्य शासनाच्या १ डिसेंबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद आपत्कालीन प्रापण कार्यपद्धती आणि भारत सरकारच्या मालाचे प्रापण कार्यपद्धती निदेशपुस्तिका २०१७ मध्ये नमूद आपत्कालीन स्थितीतील कार्यसुपूर्तता कार्यपद्धती आणि आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नमूद प्रशासकीय व वित्तिय कार्यपद्धतीनुसार करण्यात येणार आहे.

  या रुग्णालयांकरिता पायाभूत सुविधांसह पाणी व वीज पुरवठा, डॉक्टर तसेच अन्य वैद्यकीय व्यावसायिकांची नियुक्ती, आवश्यक ती प्रमाणपत्रे प्राप्त करणे, सर्वसाधारण सुरक्षा व अग्नी सुरक्षेची तरतूद करणे, रुग्णालयांतर्गत खाटा, औषधे व अन्य सामुग्री पुरवणे इ. जबाबदाऱ्या संबंधित महानगरपालिकांच्या असणार आहेत.