नागरिकांची ट्राफिक वॉर्डनकडून होतेय लुटमार !

वाहतूक नियोजनाऐवजी करतात गाड्यांची तपासणी

कल्याण :  कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असतांनाच कल्याण आणि उल्हासनगरमध्ये ट्राफिक वॉर्डनकडून नागरिकांची लुटमार सुरु आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सरकारने वाहनासंबंधित कागदपत्रांना सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असतांना देखील हे ट्राफिक वार्डन नागरिकांना अडवून जबरदस्तीने जादा दंडाची भीती दाखवून पैसे वसुली सुरु असल्याचा आरोप कल्याण शहर कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष जयदीप सानप यांनी केला असून याबाबत त्यांनी वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांच्याकडे तक्रार केली आहे.

कोरोना महामारीच्या काळात पोलिसांचे देखील मोठे योगदान असून लॉकडाऊन काळात सुरवातीपासून पोलीस कोरोना प्रादुर्भाव कमी करण्याच्या कामात मदत करत आहेत. असे असतांना ट्राफिक वार्डन म्हणजेच वाहतूक मदतनीस यांना शासकीय कोणताही अधिकार नसताना वाहतूक पोलीस अधिकारी यांच्या साक्षीने नागरिक यांची अडवणूक करून लूट करत असल्याचे प्रकार कल्याण डोंबिवली उल्हासनगर परिसरात घडत आहेत. हे ट्राफिक वार्डन पैसे कमविण्याकरिता लॉक डाऊन उघडताच नोकरी, व्यवसाय, खरेदी निमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिक यांची पिळवणूक करून पोलीस प्रतिमा खराब करीत असल्याचा आरोप सानप यांनी केला आहे.

लॉकडाऊन मुळे सर्वच स्तरावरील नागरिक व्यापारी, कामगार यांचे नुकसान झाले असून आर्थिक मंदी असताना तसेच शासनानेही ३० सप्टेंबरपर्यंत कागदपत्रांच्या नुतनीकरणासाठी सुट दिली असताना दुर्गाडी नाका, सुभाष चौक, शांतीनगर नाका, शहाड पुल दोन्ही बाजू नेतवली नाका येथे ट्राफिक वार्डन हे अधिकार नसताना सर्व प्रकारच्या गाड्या अडवितात. सर्वात पहिले चावी काढून गाडीचे फोटो काढून कागदपत्र मागणी करतात आणि काहींना काही सरकारी नियम सांगून चूक दाखवून दंडाची रक्कम सांगतात.

रक्कम इतकी मोठी असल्याने पाहिले नागरिक विनंती करतात. पीयूसी, इन्शुरन्स,परवाना, काढून घेतो, डबल सीट नाही येणार, ओव्हर सिट नाही घेणार एवढे सांगूनही ते ऐकत नाहीत. ऑनलाईन दंड येईल तो भरा असा ट्राफिक वार्डनचा पवित्रा असतो, भरमसाठ ऑनलाईन दंड न भरण्यासाठी नागरिक तडजोड करतात आणि ट्राफिक वार्डन काढलेले फोटो डिलीट करतात. अशाप्रकारे दिवसभर लोकांची पिळवणूक सुरु असते.

वाहतूक सुरळीत करणे हे मुख्य काम असतांना केवळ नागरिकांच्या गाड्या अडवून आर्थिक लुटमार करण्याचे काम हे ट्राफिक वार्डन करत असून याठिकाणी उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांच्या सांगण्यावरूनच करत असून याबाबत वाहतूक पोलिसांना विचारले असता आम्हाला वरिष्ठांना सांभाळावे लागते असे उत्तर मिळत असल्याचे जयदीप सानप यांनी सांगितले. याबाबत त्यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांना तक्रार केली असून नागरिकांची आर्थिक लुटमार करणाऱ्या ट्राफिक वार्डन आणि वाहतूक पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान याबाबत ट्राफिक विभागाचे एसीपी उगले यांना विचारले असता या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली.