कोपरी पूलाचा मार्ग मोकळा, गर्डर लॉचिंग यशस्वी

,येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडयात हा पुल खुला होणार आहे. अशी माहिती खा.राजन विचारे यांनी दिली. रेल्वे व रस्ता वाहतुकीचा विशेष 'ट्रॅफिक ब्लॉक' घेऊन १४ पैकी उर्वरीत सात महाकाय गर्डरच्या लॉचिंगचे काम (२३ व २४ जाने.) शनिवार-रविवारी पार पडले.यावेळी कामाच्या पाहणीसाठी मध्यरात्री खा. विचारे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

ठाणे : ठाणे आणि मुंबईला जोडणाऱ्या कोपरी पुलावर गर्डर टाकण्याचे काम जानेवारी महिन्यात दोन दिवसीय दोन ब्लॉक घेऊन करण्यात आल्याने कोपरी पुलाचा मार्ग मोकळा झाला.त्यामुळे,येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडयात हा पुल खुला होणार आहे. अशी माहिती खा.राजन विचारे यांनी दिली. रेल्वे व रस्ता वाहतुकीचा विशेष ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेऊन १४ पैकी उर्वरीत सात महाकाय गर्डरच्या लॉचिंगचे काम (२३ व २४ जाने.) शनिवार-रविवारी पार पडले.यावेळी कामाच्या पाहणीसाठी मध्यरात्री खा. विचारे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

इसवी सन १९६५ साली सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोपरी पुलाचे बांधकाम केले होते. पूर्वद्रुतगती महामार्ग आठ पदरी असला तरी,कोपरी पुल चार पदरी (अरूंद) असल्यामुळे या ठिकाणी कायमच वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असे.यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या रुंदीकरणाचा ९ कोटींचा प्रस्ताव बनवला. दरम्यान,२०१३ साली भाजप आमदार संजय केळकर यांनी १० वर्ष धुळ खात पडलेली फाईल उघडुन या कामाचा सर्वप्रथम श्रीगणेशा केला. मात्र,रेल्वेचे डिझाईन (नकाशा) मंजुर न झाल्याने पुन्हा यात अडचणी उदभवल्या.

आधी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पुलाच्या रुंदीकरणाचे काम होणार होते.मात्र,त्यात दिरंगाई झाल्यामुळे पुलाच्या बांधकामाचा खर्च वाढला. त्यानंतर,तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेऊन आ.केळकर यांनी पुलाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) करण्याचा आग्रह धरल्याने फडणवीस यांच्याहस्ते नोव्हेंबर २०१८ च्या अखेरीस पुलाच्या कामाचे भूमीपूजन झाल्यानंतर कामाला वेग आला.

त्यानुसार, १६ आणि १७ जानेवारी रोजी ३५ मीटरचे सात गर्डर टाकण्यासाठी कोपरी पूलावरील वाहतुक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर रेल्वेमार्गावरील पुलावर ६३ मीटरचे महाकाय गर्डरचे लॉचिंग करण्यासाठी २३-२४ जानेवारी आणि २४-२५ जानेवारीच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात आला.यासाठी वाहतूक इतरत्र वळविण्याबरोबरच लोकल सेवा आणि काही लांबपल्ल्यांच्या गाड्याचे परिचलन पनवेल,पुणे, दादर, ठाणे आणि कल्याण स्थानकांवरून करण्यात आले.हे भलेमोठे गर्डर बसविण्यासाठी ७ क्रेन,२ पुलर, १५० हुन अधिक मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.गर्डर लॉचिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर पुलाची उर्वरीत कामे तसेच रस्त्याच्या कामांना वेग येणार असुन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात कोपरी पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.