gadkari rangayatan

ठाणे स्टेशनपासून काही अंतरावर गडकरी रंगायतन (gadkari rangayatan)ही वास्तू उभी आहे. या नाट्यगृहाच्या इमारतीला उभारुन आता २५ वर्षापेक्षा जास्तीचा काळ लोटला आहे. त्यातही या वास्तूची अनेक वेळा डागडुजीदेखील करण्यात आली आहे. त्यामुळे ही वास्तू धोकादायक स्थितीत आली आहे. 

ठाणे : शहरात नाटयप्रेमींसाठी महत्वाची मानली जाणारी राम गणेश गडकरी रंगायतन(gadkari rangayatan) ही वास्तू आता अतिधोकादायकच्या यादीत आली आहे. ठाण्याच्या इतिहासात या वास्तूने मानचा तुरा रोवला आहे. आता या वास्तूची डागडुजी करुन ती पुन्हा नाट्य रसिकांसाठी खुली करण्यात येत आहे. वास्तविक पाहता ही वास्तु पाडून पुन्हा नव्याने उभारण्याचे प्रयत्न होणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता, त्याची डागडुजी करुन नाट्य रसिकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार प्रशासनाकडून सुरु आहे. यामुळे भविष्यात येथे काही हानी झाली तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे या वास्तूची डागडुजी न करता ती वास्तू पुन्हा नव्याने उभारण्याचे नियोजन पालिकेने आखावे,अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

ठाणे स्टेशनपासून काही अंतरावर गडकरी रंगायतन ही वास्तू उभी आहे. या नाट्यगृहाच्या इमारतीला उभारुन आता २५ वर्षापेक्षा जास्तीचा काळ लोटला आहे. त्यातही या वास्तूची अनेक वेळा डागडुजीदेखील करण्यात आली आहे. त्यामुळे ही वास्तू धोकादायक स्थितीत आली आहे.  मागील वर्षी दोन वेळा या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले आहे. या दोन्ही ऑडीटमध्ये मिळालेल्या माहितीनुसार ही वास्तू अतिधोकादायक झाली असून ती पाडून पुन्हा उभारण्यात यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.

एखाद्या इमारतीच्या बाबतीत असा अहवाल आल्यास प्रशासनाच्या माध्यमातून ती इमारत तात्काळ रिकामी करुन तोडून टाकण्यात येते. एकूणच इमारतीच्या बाबतीत जो न्याय लावला जात आहे, तोच न्याय या वास्तूच्या बाबतीतही लावला जावा असे देखील जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे. आज या नाट्यगृहात १२०० च्या आसपास रसिक विविध नाटकांचे प्रयोग पाहण्यासाठी येत असतात. मात्र ही वास्तू अतिधोकादायक झाली असल्याने भविष्यात एखादा प्रयोग सुरु असताना काही हानी झाली तर त्याला जबाबदार प्रशासन राहणार आहे का? याचेही उत्तर प्रशासनाने द्यावे.

ही वास्तू पाडण्याऐवजी पुन्हा त्या वास्तूवर दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा कोट्यवधींची उधळपट्टी करणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. एकूणच नाट्य कलाकार आणि नाट्य रसिक यांच्या जिवाशी हा एक प्रकारे खेळच म्हणावा लागणार आहे. त्यामुळे या मागणीचा जाणीवपूर्वक विचार करुन या वास्तुची डागडुजी न करता ती वास्तू पाडून पुन्हा ठाणेकर नाट्य रसिकांसाठी तेवढ्याच ताकदीची नवीन वास्तू उभारण्यात यावी,अशी मागणी काँग्रेसचे राजेश जाधव यांनी पत्राद्वारे केली आहे. तसे न झाल्यास किंवा भविष्यात या ठिकाणी काही हानी झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.