thane congress protest

दिवसेंदिवस वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने ठाण्यातील विविध पेट्रोल पंपांसमोर निदर्शने (congress protest against fuel prize hike) करण्यात आली.

ठाणे: दिवसेंदिवस वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने ठाण्यातील विविध पेट्रोल पंपांसमोर निदर्शने (congress protest against fuel prize hike) करण्यात आली व पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना या वाढत्या किमतीकरिता मिठाई वाटप करित केंद्र सरकारमधील भाजप सरकारच्या निषेधार्थ उपहासात्मक आंदोलन केले.

पेट्रोल व डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. रोज कमी अधिक प्रमाणात या दरात वृद्धी होत चालली असून आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील तीन पेट्रोल पंपाजवळ आंदोलन केले. सेवादल काँग्रेस अध्यक्ष शेखर पाटील,जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी तीन हाथ नाका येथील पेट्रोल पंप येथे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.मानपाडा,कापुरबावडी येथील पेट्रोल पंपावर पण निदर्शने करण्यात आली.

‘अब की बार पेट्रोल ९० पार,वा रे वा मोदी सरकार’, ‘पेट्रोलची दरवाढ रद्द करा’ ,आदी घोषणा याप्रसंगी कार्यकर्ते देत होते. ठाण्यातील घोडबंदर रोड,कळवा,मुंब्रा येथील प्रत्येक पेट्रोल पंपवर काँग्रेस पदाधिकारी एकत्र येऊन निदर्शने करत आपला रोष व्यक्त करित होते.

याप्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की केंद्रातील भाजप सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून संपूर्ण देशाला फसविले आहे. यापूर्वी हेच भाजपवाले ५ रूपये दरवाढ झाली की रस्त्यावर उतरून आंदोलन करित असत आता यांच्या कारकीर्दीत पेट्रोलची तिप्पट दरवाढ झालीय आता भाजपवाले गप्प का? असा प्रश्न विचारून ज्या लोकांनी भाजपावर विश्वास दाखवत समर्थन करत होते त्यांची कशी फसवणूक झाली हे लक्षात राहावे म्हणून आम्ही त्यांना मिठाई वाटली व केंद्र सरकारने केलेल्या वायद्याची आठवण करुन दिली.