पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या आरोपीला कोरोनाची लागण, उपचारादरम्यान कोरोनाग्रस्त आरोपीने केला पोबारा

कल्याण : पत्नीच्या हत्ये प्रकरणी अटकेत असणाऱ्या आरोपीला कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी टाटा आमंत्रण बिल्डिंग राजनोली नाका येथे ठेवण्यात आले असता रविवारी दुपारी या आरोपीने तेथुन पोबारा केला

 कल्याण : पत्नीच्या हत्ये प्रकरणी अटकेत असणाऱ्या आरोपीला कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी टाटा आमंत्रण बिल्डिंग राजनोली नाका येथे ठेवण्यात आले असता रविवारी दुपारी या आरोपीने तेथुन पोबारा केला आहे. फरार आरोपी कोरोना बाधित असल्याने त्यांच्या पासुन निर्माण होणाऱ्या संसर्गाचा धोका असल्याने पोलीस यंत्रणेला त्याचा शोध घेऊन पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

मे २०२० महिन्याच्या अखेरीस मोहने येथील जेतवन नगर आदिवासी पाड्यात राहणाऱ्या बाळू खरात याने पत्नीला गळफास देऊन हत्या केल्याप्रकरणी  खडकपाडा पोलिसांनी तातडीने तपास करीत अटक केली होती. अटकेत असलेल्या आरोपी बाळु खरात यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने उपचाराकरिता १६जून रोजीपासुन टाटा आमंत्रण बिल्डिंग राजणोली नाका येथे ठेवण्यात आले होते. आरोपी कोरोना रूग्ण बाळुवर तेथे उपचार सुरू असताना रविवारी २१ जून रोजी दुपारी २.००वा.चे सुमारास गर्दीचा फायदा घेत आरोपी कोरोना रुग्ण बाळुने पोबारा केला. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गु.नं १६६/२०२० भा.द.वि क. २२४,१८८,२६९,२७१ सह महाराष्ट्र कोव्हिड – १९ उपाययोजना नियम ११सह साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम १८९७चे कलम २,३, ४ सह आप्पती व्यवस्थापन अधिनियम २००५चे क. ५१(ब)  प्रमाणे दाखल झाला आहे. फरार आरोपी कोरोना रुग्णांच्या शोधात पोलीस आहेत. पोलिसांनी या आरोपीबाबत जो माहिती देईल त्याचे नाव गुपित ठेवून त्याला योग्य ते बक्षीस दिले जाणार असल्याचे घोषित केले आहे. तरी आरोपी कोरोनाग्रस्त बाळु खरात आढळून आल्यास पोलीसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.