मृत्यूनंतरही कोरोना रुग्णाचे हाल; दफनविधीसाठी नातेवाईकांची ४ तास वणवण

पत्नी त्यांना महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आली. त्यावेळी त्यांची ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा कोविड टेस्ट रिपार्ट पॉझिटिव्ह आला.

    कल्याण  : कल्याणमध्ये एका व्यक्तीच्या  मृत्यूनंतर त्याची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. या व्यक्तीच्या दफनविधीसाठी शेजाऱ्यांना चार तास वणवण फिरावे लागले. कारण एकही कब्रस्थान दफनविधी करण्यास तयार नव्हते. अखेर मीडियामध्ये हे प्रकरण पोहचताच एका कब्रस्थानने त्यांच्यावर दफनविधी करण्यास तयारी दाखवली. या घटनेमुळे माणुसकी खरंच शिल्लक राहिली की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

    कल्याणच्या वालधुनी परिसरात राहणारे एक व्यक्ती काही महिन्यांपासून किडणीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांची पत्नी आणि चार वर्षाचा मुलगा असा त्यांचा परिवार आहे. रात्री त्यांना जास्त त्रास झाल्याने त्यांची पत्नी त्यांना महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आली. त्यावेळी त्यांची ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा कोविड टेस्ट रिपार्ट पॉझिटिव्ह आला. मात्र, याच कारणावरुन त्यांच्या दफनविधीला कल्याणमधील तीनही कब्रस्थानने नकार दिला.

    मृतक व्यक्तीच्या शेजारी राहणारे नासीर शेख यांना देखील प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं. अंत्यविधीसाठी मृतदेह आधी रुग्णवाहिका चालकाने स्मशानभूमीत नेला. त्याठिकाणी जागा नव्हती. त्यानंतर चालकाच्या लक्षात आले की रुग्ण मुस्लिम आहे. त्याला कब्रस्थानला न्यावे लागेल. गोंधळलेल्या परिस्थितीत त्याने मृतदेह पुन्हा रुक्मीणीबाईला आणला. सकाळी त्याचे शेजारी नासीर आणि काही लोक पोहचले त्यांनी मृतदेह घेऊन दफनविधीसाठी तीन कब्रस्थान फिरले. कल्याणच्या टेकडी कब्रस्थानमध्ये सांगण्यात आले की, आमच्या इथे नाही होणार. दुसरीकडे न्या. दुसऱ्याने तिसऱ्याकडे बोट दाखविले. तिसऱ्याने पुन्हा टेकडी कब्रस्थानचे नाव सांगितले.

    चार तास नासीर आणि त्याचे मित्र मृतदेह घेऊन फिरत होते. पुन्हा मृतदेह रक्मिणीबाई रुग्णालयात आणला. हे प्रकरण मीडियाकडे गेल्याचे कळताच शहाड येथील एका कब्रस्थानने त्या व्यक्तिच्या मृतदेहावर दफनविधी करण्याची तयारी दाखविली. जीवन जगताना सामान्यांना प्रत्येक गोष्टीसाठी वणवण करावी लागते. मृत्यूनंतरही त्यांच्या नशीबातील वणवण संपत नाही हीच धक्कादायक बाब या घटनेतून समोर आली आहे.