corona vaccination in mumbra

मुंब्रा(mumbra) येथील पिंट्यादादा कंपाउंडमधील विघ्नहर्ता इमारतीमध्ये कोरोनाचा ठाण्यातील(thane) पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. इथेच आता कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

ठाणे : मुंब्रा(mumbra) येथील पिंट्यादादा कंपाउंडमधील विघ्नहर्ता इमारतीमध्ये कोरोनाचा ठाण्यातील(thane) पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने स्थानिक नगरसेवक अश्रफ (शानू ) पठाण यांनी या ठिकाणी कोविड रुग्णालय सुरु करुन घेतले होते. याच रुग्णालयात शनिवारी कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.

पहिला रुग्ण सापडल्यानंतर अनेकांनी रुग्णवाढीचा वेग मुंब्रा येथे वाढणार असल्याचे आरोप केले होते. मात्र, येथील ज्येष्ठ नगरसेवक शानू पठाण यांनी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड मेहनत आणि प्रतिबंधात्मक उपाय करुन कोरोनाला अटकाव आणला होता. या ठिकाणी त्यांनी पुढाकार घेऊन हजरत फखरुद्दीन शाह बाबा कौसा हेल्थ सेंटर नामक कोविड रुग्णालयाची निर्मिती केली होती. या रुग्णालयामध्ये शेकडो रुग्णांवर उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले होते. याच रुग्णालयामध्ये आजपासून कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी या ठिकाणी पहिले लसीकरण करण्यात आले. कोरोनाकाळात घरदार विसरुन रुग्ण सेवा करणाऱ्या डॉ. परदेशी यांना आज पहिली लस देण्यात आली. कोरोनाच्या काळात वैद्यकीय सुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्थात कोविड योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले आहे. आज दिवसभरात या केंद्रामध्ये सुमारे १०० जणांना कोविशिल्ड लस देण्यात आली.

यावेळी शानू पठाण यांनी सांगितले की, आम्ही मागणी केल्याप्रमाणे हजरत फखरुद्दीन शाह बाबा कौसा हेल्थ सेंटरची निर्मिती करण्यास डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी प्राधान्य दिले. विशेष म्हणजे, भारतीय बनावटीची ही लस आज जगाला कोरोनामुक्त करणार आहे. आम्ही सुरु रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आल्याबद्दल आम्ही डॉ. जितेंद्र आव्हाड, ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, ठाणे पालिका  अधिकारी गोसावी, डॉ. हेमांगी यांच्यासह समस्त आरोग्य विभागाचे ऋणी आहोत.