केडीएमसी निवडणुकीवर कोरोनाचे सावट, इच्छुकांच्या उत्साहावर विरजण

कोणत्याही प्रकारच्या निवडणुका आल्यानंतर विद्यमान लोकप्रतिनिधी आणि इच्छुकांकडून विविध उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांच्या माध्यमातून आपले नाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जाते. शिवाय या ना त्या निमित्ताने लोकांना भेटवस्तू (गिफ्ट) देऊन त्यांच्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न केला जातो. इतर निवडणुकांच्या तुलनेत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विविध उपक्रमांचे पेव फुटले.

  कल्याण : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे वादळ घोंघावू लागले असून त्याचे पडसाद काही महत्वाच्या जिल्ह्यासह मुंबई, ठाणे पाठोपाठ कल्याण-डोंबिवली शहरात पडू लागले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पालिका प्रशासनाने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बध अंमलात आणून कायदेशीर कारवाईसाठी पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. यामुळे आगामी पालिका निवडणुकांवर कोरोनाचे सावट असून या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. तर यामुळे अनेक इच्छुकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

  मागील वर्ष कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये गेल्याने विकासकामे आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या होत्या. त्यातच पालिकेचा पंचवार्षिक निवडणूकीचा कालवधी संपल्याने काही महिन्यांसाठी हि निवडणूक पुढे ढकलली. नवीन वर्षात कोरोनाची स्थिती हळूहळू पूर्ववत होऊ लागल्याने महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक प्रभागात कोणाकडून हळदीकुंकू, विविध सरकारी योजनांचे शिबिरे, आरोग्य शिबिरे, क्रिकेटचे सामने तर कोणाकडून सहलींचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक प्रभागात हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करून महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी पैठणी साड्या, सोन्याची नथ, गृहुपयोगी वस्तू आदींसह विविध गिफ्टचे वाटप करण्याचे कामही जोरात सुरू होते. प्रभागातील ज्या महिला कार्यक्रमाला येत नाहीत, त्यांना घरपोच गिफ्ट दिले गेले.

  कोणत्याही प्रकारच्या निवडणुका आल्यानंतर विद्यमान लोकप्रतिनिधी आणि इच्छुकांकडून विविध उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांच्या माध्यमातून आपले नाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जाते. शिवाय या ना त्या निमित्ताने लोकांना भेटवस्तू (गिफ्ट) देऊन त्यांच्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न केला जातो. इतर निवडणुकांच्या तुलनेत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विविध उपक्रमांचे पेव फुटले.

  पालिकेची पंचवार्षिक निवडणूक महिनाभरावर आल्याने हाती राहिलेल्या वेळेत जास्तीत जास्त नागरिकांवर छाप पाडण्याचे आव्हान विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांच्या समोर होते. ते पेलण्यासाठी निर्बंध असतानाही इच्छुकांकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा सर्व घाट घातला जात असतांनाच कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढत असल्याने राज्य सरकारसह पालिका आयुक्तांनी पालिका क्षेत्रात अनेक निर्बंध लागू केले आहेत.

  या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याने अनेक इच्छुकांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. यामुळे अनेक इच्छुकांचे मोठे आर्थिक नुकसान देखील झाले आहे. शिवाय वाढत्या कोरोनाच्या सर्सगामुळे सद्यस्थितीला सामोरे जातांना पालिकेची आगामी निवडणुक तूर्तास पुढे ढकलण्यात येणार असून दिवाळी नंतरच पालिकेच्या निवडणुका घेतल्या जातील असे मत राजकीय विश्लेषका कडून व्यक्त केले जात आहे. यामुळे या इच्छुकांचे निवडणुकीचे बजेट मात्र कोलमडले आहे.

  दरम्यान कल्याण डोंबिवली मनपा सचिव संजय जाधव यांना मनपा निवडणूका लांबणीवर जाणार का असे विचारले असता त्यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाच्या पहिल्या आलेल्या पत्रानुसार १२२ प्रभागांसाठी निवडणूक घेण्याच्या कार्यक्रमाची तयारी असुन आगमी निवडणूक कार्यक्रम प्रक्रिया बाबत निवडणूक आयोगाचे आदेश आल्यानंतर अमंलबजावणी केली जाईल.”