eknath shinde

ठाणे: मुंबईप्रमाणेच ठाणे जिल्हयातील शाळाही ३१ डिसेंबर पर्यंत बंद राहणार आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शाळा बंद ठेवण्याचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले आहेत. सेामवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार होते. आता मात्र नवीन वर्षातच शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.

दिवाळीनंतर कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्हयात ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, केडीएमसी, भिवंडी उल्हासनगर या  सहा महापालिका आणि अंबरनाथ बदलापूर या नगरपालिकांचा समावेश आहे.

जिल्हयात सर्वाधिक शाळा असून, विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. ठाण्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. शाळा बंद ठेवल्याने त्यावर नियंत्रण राहिल असे शिंदे यांचे म्हणणे आहे.

शालेय शिक्षण विभागाने सोमवार, २३ नोव्हेंबर पासून राज्यातील ९ वी ते १२ वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने शाळांमध्ये साफ सफाई, फवारणी, शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत होती. मात्र, दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता शासन प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यातच दिवाळीनंतर कारेाना रूग्णांच्या संख्येत वाढ हेाताना दिसत आहे.  स्थानिक परिस्थिती बघून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात यावा असे शिक्षणमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.  मुंबईच्या आयुक्तांनी ३१ डिसेंबर पर्यंत शाळा सुरू न करण्याचे आदेश दिले आहेत, त्याबरोबरच आता ठाणे जिल्हयातील शाळाही बंद राहणार आहेत

भाजपची शाळा बंद ठेवण्याची मागणी

ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, मीरा भाईंदर, पनवेल, मनपा तसेच अंबरनाथ, बदलापूर, वसई विरार नपा, मनपा आयुक्त, महापौर, प्रशासन अधिकारी यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे.