kdmc commissioner shop visit

कल्याण : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महापालिका क्षेत्रात अजुनही बऱ्याच ठिकाणी विशेषतः मार्केट परिसरात गर्दी होत असल्‍याचे निदर्शनास येत असून कोरोना साथीचा प्रादुर्भावही मोठया प्रमाणात होताना दिसून येत आहे. त्‍यामुळे पालिका आयुक्‍तांनी(commissioner) आज अचानक कल्‍याण पश्चिममधील झुंजारराव मार्केट परिसराला भेट देवून तेथील दुकानांची पाहणी केली. दुकानदार मार्गदर्शन सुचनांचे पालन करतात किंवा नाही याची माहिती घेतली आणि अशा प्रकारे सुचनांचे पालन न करणाऱ्या दुकानदारास ५ हजारांचा दंड ठोठावण्‍याची धडक कारवाई केली.

कोरोना साथीच्‍या वाढत्‍या प्रादुभावामुळे सावर्जनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांवर मास्‍क न घातल्‍यास दंडनीय कारवाई करायच्‍या कडक सूचना आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी(dr.vijay suryawanshi) यांनी यापूर्वीच सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दिलेल्‍या आहेत. त्‍यानुसार महापालिकेच्‍या भरारी पथकांनी रविवारी तब्‍बल दोन लाख रूपये दंड स्‍वरूपात वसुल केले आहेत.

नागरिकांनीदेखील संसर्गाचा धोका टाळण्‍यासाठी मास्‍क न घालता बाहेर वावरू नये, परिधान केलेला मास्‍क वारंवार काढू नये, आपल्‍या सुरक्षिततेसाठी मास्‍क वापरावा तसेच ज्‍या दुकानात मास्‍क घालत नसतील त्‍या दुकानात जावु नका असे आवाहन आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. यावेळी पोलीस उपायुक्‍त विवेक पानसरे, महात्मा फुले चौक पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर, ब प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्‍ते, क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे त्यांच्या समवेत होते.