ठाण्यात कोरोना हॉस्पिटल्स ७० टक्के “फुल्ल”, या ठिकाणी वाढवणार बेडची संख्या

ठाणे शहरात एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे ५० टक्के रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. ज्या रुग्णांना लक्षणे दिसून येत नाहीत, त्या रुग्णांना होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच प्रामुख्याने या रुग्णांमध्ये तरुण वर्गाचा जास्त समावेश असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्यांना किरकोळ आजार आहेत, अश्या जेष्ठ नागरिकांनाच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.

     वसंत चव्हाण 

    ठाणे :  राज्यासह ठाणे जिल्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असून जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा कामाला लागले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून हळूहळू ठाण्यातील पालिका हॉस्पिटलसह खासगी हॉस्पिटल मध्ये भरती सुरू झाली आहे. एकप्रकारे ही चिंतेची बाब असून आतापर्यंत शहरातील कोरोनावर उपचार करणारे हॉस्पिटल ७० टक्के फुल्ल झाले असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरी जिल्हा प्रशासन आणि पालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनेनुसार शहरात योग्य ती खबरदारी घेण्यात येत असली, तरी शहरात रुग्ण वाढीची वेग जोरदार आहे.

    रुग्ण आढळून येण्याची संख्या आता जास्त होत आहे. जिल्हा प्रशासन कामाला लागले असून येत्या दोन दिवसांत सिव्हिल रुग्णालयातील बेड वाढवण्यात येणार आहेत.

    डॉ.कैलाश पवार ( जिल्हा शैल्य चिकित्सक)

    कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होवू नये, यासाठी मार्गदर्शनाखाली पालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून महापालिका क्षेत्रात ४२२१ कोविड बेडसची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे महापलिकेचे ग्लोबल रुग्णालय हे १ हजार बेड चे असून त्यामध्ये अवघे २१५ बेड शिल्लक आहेत. तर सिव्हिल रुग्णालयात ३० टक्के बेड रिकामे आहे. दरम्यान ठाण्यातील खासगी रुग्णालये देखील ६० टक्के बेड भरले आहेत. त्यामुळे एकप्रकारे चिंताजनक बाब समोर आली आहे.

    पालिका प्रशासन योग्य उपयोजना करत आहे. रूगांची संख्या वाढत असून काळजी करण्याचे कारण नाही,प्रत्येक रुग्णाला उपचार मिळाले हा हेतू आमचा असून पालिकेने दिलेल्या सर्व नियमाचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत पार्किंग प्लाझा येथेही १ हजार बेड ची व्यवस्था करण्यात येणार आहे.

    डॉ.राजू मुरुडकर, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा

    एकीकडे ठाण्यात एकूण ४२२१ कोविड बेडससह महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. ठाण्यात, सिव्हिल रुग्णालय, विराज हॉस्पिटल, स्वयंम हॉस्पिटल,ठाणे हेल्थ केअर, मेट्रो पोल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, टायटन हॉस्पिटल, कौशल्या मेडिकल, वेदांत हॉस्पिटल, सफायर हॉस्पिटलमध्ये (खारेगाव), बेथनी हॉस्पिटल, हाईलँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, एकता हॉस्पिटल, विराज हॉस्पिटल, कैझेन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, वेदांत मल्टीस्पॅसिटी हॉस्पिटलअँड रिसर्च सेंटर, वेदांत एक्सटेंशन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, हॉरिझन प्राइम हॉस्पिटल, ठाणे नोबल हॉस्पिटल या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार होत आहे.

    ठाण्यात ५० टक्के रुग्ण “होम कोरोटाईन”

    ठाणे शहरात एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे ५० टक्के रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. ज्या रुग्णांना लक्षणे दिसून येत नाहीत, त्या रुग्णांना होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच प्रामुख्याने या रुग्णांमध्ये तरुण वर्गाचा जास्त समावेश असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्यांना किरकोळ आजार आहेत, अश्या जेष्ठ नागरिकांनाच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.

    मॉल्समध्ये प्रवेशासाठी आता अँटीजन चाचणी 

    शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मॉलमध्ये प्रवेश करताना अँटीजन कोरोना चाचणी करावी लागणार असून चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच  मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिली.  सद्यस्थितीत नागरिकांना गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. शहरातील मॉल्स, तसेच मार्केट मध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

    नागरिकांची गर्दी कमी करून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली असून मॉल्समध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांची अँटीजन कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे शहरातील सर्व मॉल्समध्ये उद्यापासून अँटीजन चाचणी सुरू होणार करण्यात येणार असून चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच मॉल्समध्ये प्रवेश दिला जाणार आहे.