भिवंडीत कामगारास बेदम मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

  • हाड मोडून फ्रॅक्चर  केले

ठाणे (भिवंडी).  यंत्रमाग कारखान्यातून दुपारच्या वेळी जेवण करण्यासाठी घरी जात असताना कामगारास रस्त्यात अडवून त्यास अज्ञात कारणावरून जीवे ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ करण्यात आली. यानंतर आरोपींनी कामगाराला मोटार सायकलच्या शॉकअप रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना वेताळपाडा येथील बाबा हॉटेलजवळ घडली आहे. याप्रकरणी एका इसमावर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशरफ पप्पू अन्सारी (३५) असे हल्लेखोराचे नाव आहे. कामगार फिरोज जाने आलम अन्सारी (३०, रा .वेताळ पाडा ) हा नेहमीप्रमाणे कामावरून घरी जेवण करण्यासाठी जात होता. त्यावेळी आरोपी अशरफने फिरोजला अज्ञात कारणावरून रस्त्यात अडविले आणि शिवीगाळ करत शॉकअपने त्याच्या डाव्या पायावर जोरजोराने मारून हाड मोडून फ्रॅक्चर  केले. घटनेचा पुढील तपास शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एन.डी. जाधव करीत आहेत.