डोंबिवलीत पालिकेच्या क्रीडा संकुलातील भाजी मार्केटमध्ये भाजी घेऊन येणाऱ्या गाड्यांची गर्दी

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापासलिकेने कल्याण येथील ए.पी. एम. सी. मार्केट बंद करून कल्याण व डोंबिवलीत मोकळ्या मैदानावर भाजी मार्केट सुरू केले. यासाठी क्रीडा संकुलात ९० गाळे तात्पुरते उभारण्यात आले

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापासलिकेने कल्याण येथील ए.पी. एम. सी. मार्केट बंद करून कल्याण व डोंबिवलीत मोकळ्या मैदानावर भाजी मार्केट सुरू केले. यासाठी क्रीडा संकुलात ९० गाळे तात्पुरते उभारण्यात आले आहेत. मात्र डोंबिवलीतील इतर मार्केटमध्ये भाजी गाड्या न जाता क्रीडा संकुलात येत असल्याने तेथे प्रचंड गर्दी होत असून मूळ उद्देशच हरवला आहे. यामुळे मैदानावरील भाजी मार्केट बंद करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया कर्मचारी व्यक्त करीत आहेत. यामुळे रोज होणाऱ्या गर्दीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट होत आहे.

नागरिकांना योग्य प्रकारे भाजी मिळावी म्हणून महापालिकेने डोंबिवलीत डी.एन.सी., शाळा, प्रीमियर मैदान, भागशाला मैदान व क्रीडा संकुल  अशा ४ मैदानावर व कल्याणमध्ये फडके मैदान, सुभाष मैदान अशा दोन ठिकाणी भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांनी भाजी आणावी व  होलसेल विक्री करणाऱ्या व्यापारी आहेत त्यांनी भाजी न्यावी म्हणजे गर्दी होणार नाही, असे नियोजन केले आहे. पण या योजनेला वाहनचालक व नागरिकांनी हरताळ फासला असून उद्देश सफल झाला नाही. डोंबिवलीत क्रीडा संकुलातील मैदानावर पहाटे मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेऊन येणारी वाहने प्रचंड गर्दी करतात व इतर मैदानावर मात्र  कोणी जाण्यास तयार होत नाही. यामुळे क्रीडा संकुलातील नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. सर्व भाजी वाहने क्रीडा संकुलात येत असल्याने वाहनांची गर्दी होऊन गोधळ होतो. वाहन चालक व नागरिक शिस्त पाळत नाहीत यापेक्षा हे बंदच करावे अशी भावना कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

क्रीडा संकुल केवळ होलसेल भाजी विक्रेतेसाठी असले तरी त्याठिकाणी नागरिकही किरकोळ खरेदीसाठी तेथे येत असल्याने प्रचंड गर्दी होते. कोरोना रोगामुळे योग्य अंतर ठेवण्याचा उद्देश सफल होत नाही. यामुळे मैदानावरील भाजी मार्केट बंद करा असेही वाहन चालक बोलत आहेत. प्रत्येक मैदानासाठी ५० -५० वाहनांची विभागणी केली तर गर्दीचे विभाजन होईल असे मत एफ विभाग प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांनी व्यक्त केले तसेच क्रीडा संकुलात शिस्त राखण्यासाठी पोलिसांनी मदत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मात्र याबाबत याच परिसरातील ठाणे जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष जनार्दन काळण आणि माजी सरपंच चंद्रशेखर शिंदे यांनी दिलेल्या माहितप्रमाणे जरी क्रीडा संकुलात भाजी मार्केटसाठी परवानगी दिली असली तर भाजीवाले सर्रास तेथील रस्त्यावरही भाजीचा धंदा करीत आहेत. परिसरात हजारोंच्या संख्येने नागरिकांची रोज वर्दळ होत असून सद्य कोरोना रोगाच्या काळात हे फार वाईट आहे. येथे कोणत्याही नियमांचे पालन होत नसून अशा गर्दीमुळे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची दाट भीती आहे. याबाबत अनेक वेळा पालिका आयुक्त तसेच अधिकारी वर्गाला याची माहिती देण्यात आली आहे. परंतु याकडे डोळेझाक होत असून कोणालाच याचे भान नसल्याने खंत वाटत आहे. आम्ही काही सामाजिक कार्यकर्ते रात्री २ – ३ वाजत उठून अशा गर्दी करणाऱ्या लोकांना घालविण्याचा प्रयत्न करीत असतो पण आमचे प्रयत्न अपुरे पडत आहे. पालिका प्रशासनाने वेळीच याची दखल घ्यावी नाहीतर आमच्या या विभागात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्यास वेळ लागणार नाही. या प्रकारामुळे येथील जनता घाबरून गेली असून आता फक्त पालिका अधिकारी काय करतात याकडे डोळे लागले आहेत.