दिवा -पनवेल रेल्वे मार्गावरील धोकादायक पूल १५ जूनपासून वाहतुकीसाठी बंद

डोंबिवली : डोंबिवलीजवळ निळजे येथील दिवा पनवेल रेल्वे मार्गावरील पूल धोकादायक असल्याने १५ जूनपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आणखी मनस्ताप सहन करावा लागणार आहे. दिवा पनवेल मार्गावरील उड्डाणपूल सुमारे ५० वर्षांपूर्वीचा असून ९ मीटर रुंद व १५ मीटर लांबीचा आहे. मध्यंतरी आयआयटीने पुलाची पहाणी केली होती. त्यांनी हा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचा अहवाल रेल्वेला दिला होता. रेल्वेने १५ जूनपासून हा पूल सर्व वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे.

पनवेल दिवा रेल्वे लाईनवरील कि.मी. ४५ / ६- ७ जवळील जुन्या निळजे रेल्वे उड्डाणपूल असून वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवलीतील पत्री पूल व डोंबिवलीतील कोपर पूल धोकादायक झाल्याने आयआयटीने वाहतूक बंद करण्याची शिफारस केली होती. आता निळजे पूल धोकादायक ठरवल्याने धोकादायक पुलाची हॅट्रिक झाली आहे.