कसारा घाटात दरड कोसळली; रेल्वे वाहतूक खोळंबली, रूळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

कसारा घाटात संततधार पाऊस सुरू असल्याने रेल्वे रुळावर दरड कोसळली. यात रुळाचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरड कोसळल्यानंतर टिटवाळा ते इगतपुरी आणि अंबरनाथ ते कर्जत, लोणावळा या दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

    गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अद्यापही पावसाचा जोर कायम असून पुन्हा एकदा पावसामुळे रेल्वे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. टिटवाळा ते इगतपुरी दरम्यान कसारा घाटात दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. तसेच दरड कोसळल्याने रेल्वे रूळांचं मोठं नुकसानं झालं आहे.

    दरम्यान, नाशिक आणि पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर अंबरनाथ ते कर्जत, लोणावळा दरम्यानची रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली. तर अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

    मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, कसारा घाटात संततधार पाऊस सुरू असल्याने रेल्वे रुळावर दरड कोसळली. यात रुळाचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरड कोसळल्यानंतर टिटवाळा ते इगतपुरी आणि अंबरनाथ ते कर्जत, लोणावळा या दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि अंबरनाथ ते सीएसएमटी पर्यंतची रेल्वे वाहतूक सुरू आहे.