रेडझोन जिल्ह्यात शैक्षणिक प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन करा- भाजपा शिक्षक आघाडीची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

कल्याण : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा १५ मार्चपासून बंद आहेत. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असताना आपल्या पाल्याचा प्रवेश इतर शाळांमध्ये कसा करावा या कारणावरून

 कल्याण : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा १५ मार्चपासून बंद आहेत. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असताना आपल्या पाल्याचा प्रवेश इतर शाळांमध्ये कसा करावा या कारणावरून नागरिक त्रस्त असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अनुदानित शाळांमधील इयत्ता पाचवीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सह संयोजक विकास पाटील यांनी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

 मार्च, एप्रिल व मे हे महिने शाळेत प्रवेश घेण्याचे असतात. असंख्य पालकांना इयत्ता पहिली व पाचवीत दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा असतो. पुढे आता शाळा थेट पुढील शैक्षणिक सत्रातच सुरु होणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिवांच्या पत्राने निश्चित झाले आहे. यामुळे महाराष्ट्रातील लाखो पालकांसमोर पाल्याच्या प्रवेशाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून खाजगी अनुदानित शाळेत ऑनलाईन प्रवेशाची मागणी पालकांमार्फत होत आहे. त्यामुळे शालेय प्रशासनावर देखील विद्यार्थी प्रवेशाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अकरावी व ‘आरटीई’ प्रवेश ऑनलाईन होऊ शकतात तर इयत्ता पाचवीचे का नाही, असा सवाल भाजपा शिक्षक आघाडीने उपस्थित केला आहे   
राज्यातील अनुदानित शाळेतील संपूर्ण प्रवेशप्रक्रिया थांबलेल्या आहेत. त्यामुळे निदान कोरोनामुळे ‘रेडझोन’ जिल्ह्यात तरी इयत्ता पाचवीची प्रवेशप्रक्रिया प्रायोगित तत्वावर ऑनलाईन पद्धतीने अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेच्या धर्तीवर राबविल्यास पालकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. शालेय प्रशासनालाही सोयीचे होईल असे सुचविण्यात आले आहे.
यामुळे रेडझोन जिल्ह्यात तरी अनुदानित शाळेत ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपा शिक्षक आघाडीच्या महाराष्ट्र संयोजिका डॉ. कल्पना पांडे, प्रदेश सहसंयोजक विकास पाटील आणि डॉ. उल्हास फडके, विदर्भ संयोजक अनिल शिवनकर, कोकण विभाग संयोजक एन. एम. भामरे, कल्याण जिल्हा संयोजक विनोद शेलकर यांनी केली आहे.