हनुमान टेकडी भागातील सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी

भिवंडी: भिवंडी(bhivandi) शहरातील देहविक्री करणाऱ्या महिलांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमान टेकडी येथील नागरी सुविधांची दुरवस्था झाली असून त्यामुळे येथील महिलांना नरकयातना भोगाव्या लागत असल्याने या महिलांच्या वस्तीतील नागरी सुविधा तात्काळ सुधारण्यात याव्यात, अशी मागणी श्री साई सेवा संस्थेच्या वतीने भिवंडी महानगरपालिका आयुक्त डॉ पंकज आशिया(pankaj ashiya) यांची भेट घेऊन करण्यात आली आहे .

हनुमान टेकडी या भागात असलेल्या देहविक्री करणाऱ्या महिलांची वस्ती असून तेथील परीसरात नादुरुस्त रस्ते, अनियमित पाणी पुरवठा ,सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्याने येथील महिलांना मनस्ताप सहन करावा लागत असून येथील महिलांची वेळोवेळी आरोग्य तपासणी होणे गरजेचे असल्याने किमान आठवड्यातून एकदा या भागात नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व्हावी अशी मागणी श्री साई सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ स्वाती खान यांनी आयुक्त डॉ पंकज आशिया यांच्याकडे केली आहे .

डॉ स्वाती खान यांसह डॉ आसिफ खान ,सद्दाम खान, चंद्रकला हेगडे ,गौरी ,अरविंद जैस्वार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने येथील समस्यांबाबत आयुक्तांची मुख्यालयात भेट घेऊन त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. हनुमान टेकडी येथील महिलांसाठी सामाजिक, आर्थिक परिवर्तन करण्याच्या उद्देशाने काम करणाऱ्या श्री साई सेवा संस्थेच्या माध्यमातुन महिलांचे देहविक्री व्यवसायातून मन परिवर्तन घडवून आणण्यात येत असून त्या साठी येथील महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार व्यवसाय सुरू करण्यात येत असून त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी डॉ स्वाती खान यांनी केली आहे .या प्रकरणी महानगरपालिका संबंधित विभागांना येथील नागरी समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तात्काळ सांगण्यात येत असल्याचे सांगत जागा देण्याबाबत महानगरपालिका स्तरावर कोणता निर्णय घेता येऊ शकतो, याबाबत अभ्यास करुन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळास दिल्याची माहिती डॉ स्वाती खान यांनी दिली आहे .