Municipal Corporation to implement CM City Road Scheme in Thane It will help in developing undeveloped roads

पालिकेच्या कुर्ला व वांद्रे येथील भाभा रुग्णालय, व्ही. एन. देसाई रुग्णालय, कांदिवली येथील आंबेडकर हॉस्पिटल, एम एम एम सेन्टेनरी, राजावाडी आदी रुग्णालयात मेडिसिन, सर्जरी, पेडिएट्रिक, ऍनेस्थीया, रेडिओलॉजी, नाक कान घसा, पॅथॉलॉजी आदी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ग्रेड १ साठी २ लाख रुपये तर ग्रेड २ साठी दिड लाख रुपये इतके मानधन देण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

मुंबई : मुंबई मनपाच्या रुग्णालयात शिक्षक ग्रेड १ आणि २ पदासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत कोरोना काळात काम करणाऱ्या डॉक्टरांना संधी द्यावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले. त्यामुळे कोरोना योध्दा म्हणून काम केलेल्या डॉक्टरांना दिलासा मिळणार आहे.

प्रशासनाने यासंदर्भातील प्रसिध्द केलेल्या वृत्तपत्रातील जाहिरातीवर सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा मांडला. बाहेरून येणाऱ्या डॉक्टरांना दिड ते दोन लाख रुपये पालिका मानधन देणार आहे. परंतु, पालिका रुग्णालयातील डॉक्टरांना १ लाख २० हजार रुपये इतकाच पगार मिळतो. त्यामुळे पालिकेचे डॉक्टर नोकऱ्या सोडून या पदासाठी अर्ज करतील. अशाने पालिकेच्या केईएम, रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता भासेल.

डॉक्टरांची कमतरता भासू नये, यासाठी कोरोना काळात ज्या डॉक्टरांनी रुग्णांची चांगली सेवा केली, अशा डॉक्टरांना या पदावर सामावून घ्यावे, अशी मागणी राऊत यांनी केली. सर्वपक्षीय सदस्यांनी या मुद्द्याला पाठिंबा दिला. तसेच कोविड काम केलेल्या परिचारिका आणि डॉकटरांना पालिका सेवेत सामावून घेण्याची मागणी केली. 

वयोमर्यादा मर्यादीत ठेवा

डॉक्टरांच्या निवृत्तीचं वय ५८ वर्ष इतके होते. त्यात बदल करून ते ६० आणि नंतर ६२ वर्ष केले. आता वर्योमर्यादा ६५ वर्ष करण्याचा प्रशासनाचा घाट आहे. कनिष्ठ डॉक्टरांवर हा अन्याय आहे. एकीकडे कोरोना काळात ५० वर्षाहून अधिक वय असलेल्या नागरिकांना धोका असल्याने घरी राहण्याचा सल्ला दिला जातो. मग ज्या डॉक्टरांचे वय झाले आहे, त्यांना वरिष्ठ पदावर नियुक्त करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित करत पालिकेने डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६२ वर्षे मर्यादीत ठेवावे, असं म्हटले आहे.