देवेंद्र फडणवीसांना अजूनही ‘मी पुन्हा येईन’ ही आशा, नवी मुंबईत केलं सूचक विधान

अण्णासाहेब पाटील यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा मेळावा नवी मुंबईत(Mathadi Workers Meet In Navi Mumbai) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी(Denvendra Fadanvis) सूचक विधान केलं आहे.

    नवी मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी नवी मुंबईत(Navi Mumbai) बोलताना एक सूचक विधान केलं आहे. अण्णासाहेब पाटील यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा मेळावा नवी मुंबईत(Mathadi Workers Meet In Navi Mumbai) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात फडणवीसांनी हे विधान केलं आहे.

    “या सरकारला आता माथाडींचे प्रश्न सोडवण्याची संधी आहे, तेही सोडवतील असा मला विश्वास आहे. नाही सोडवले तर आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. तेव्हा आम्ही ते प्रश्न सोडवू. तीही अडचण नाही. लोकशाहीमध्ये कमी-अधिक होत असतं. कधी हे असतात, कधी ते असतात. पण कामगारांचे प्रश्न पक्षाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवेत”, असं फडणवीस म्हणाले.

    “माथाडींच्या चळवळीसाठी आमच्या काळात सरकारचे दरवाजे आम्ही पूर्णपणे उघडे केले होते. माथाडी नेत्यांनी कधीही प्रश्न मांडले की आम्ही ते सोडवायचो, अशी व्यवस्था आम्ही उभी केली होती. पुढचा काळ मिळाला असता, तर उरलेले प्रश्नही सोडवले असते”, असं ते म्हणाले.

    “आज करोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम आपण घेतला. नरेंद्र पाटील म्हणाले होते की की केंद्रीय श्रममंत्री या कार्यक्रमात यायला हवेत. मी त्यांना म्हटलं की आपल्या कार्यक्रमात संख्या इतकी असते की कोविडचे नियम मोडल्याबद्दल आपल्यावर नक्की गुन्हा दाखल होईल. पण नरेंद्रजींनी याच वर्षी केंद्रीय श्रममंत्र्यांना बोलवायला सांगितलं. ते म्हणाले, काही काळजी करू नका. नियमानुसार दोन्ही डोस घेतलेले लोक सभागृहात उपस्थित राहतील आणि इतर सगळे जण ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रम पाहतील. मी भूपेंद्र यादव यांचे आभार मानतो की त्यांनी फक्त एका फोनवर कार्यक्रमाला येण्यासाठी होकार दिला”, असं फडणवीस म्हणाले.