bhivandi corona hospital

भिवंडी: मुंबई, ठाणे येथील रुग्णालयांवर आरोग्य सुविधेचा भार अधिक वाढत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे समोर आल्याने त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील आरोग्य सेवा अत्याधुनिक कशा होतील याकडे कटाक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी(bhivandi) तालुक्यातील सावद ग्रामपंचायत क्षेत्रात उभारले जाणारे अत्याधुनिक कोव्हिड रुग्णालय(kovid hospital) भविष्यात जिल्ह्याचे साथ रोग नियंत्रण रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होईल. असे अत्याधुनिक रुग्णालय २ लाख ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेत बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात असूूून त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच रुग्णांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती भिवंडी प्रांत अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांनी दिली आहेे.

तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण व मृत्यु संख्या वाढत असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करणारी सक्षम आरोग्य यंत्रणा उभारली जावी, अशी मागणी ग्रामीण भागातून करण्यात येत होती त्याची दखल भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांनी घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करून भिवंडी- कल्याण या महामार्गावरील सावद ग्रामपंचायत क्षेत्रातील सदरचे गोदाम बांधकाम याची निवड केली आहे. हे ठिकाण भिवंडी, शहापूरसह कल्याण, मुरबाड या तालुक्यातील ग्रामीण भागासाठीसुद्धा सोयीस्कर आहे. या जागेवर तब्बल ४० दिवस दिवसरात्र मेहनत करून हे रुग्णालय निर्माण करण्यात येत आहे. एकूण ३६० महिला ,३७९ पुरुष,ऑक्सीजन बेडच्या सुविधेसह ८० अतिदक्षता कक्षात २० व्हेंटिलेटर ,२० बायपॅक व ४० हायफ्लो नॅशल कॅनॉल सुविधा असलेले बेड या ठिकाणी उपलब्ध केले आहेत.

या  रुग्णालयाची माहिती देताना उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांनी सांगितले की, हे रुग्णालय उभारले जात असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः चार वेळा भेटी देऊन येथील कामाचा आढावा घेऊन कामामध्ये कोणतीही कमतरता करू नये अशा सूचना केल्या आहेत. या रुग्णालयात वापरण्यात आलेले सर्व साहित्य हे आग प्रतिरोधक असून हे पुनः वापरात येणारे आहे. त्यामुळे या ठिकाणी साहित्याचा होणारा घसारा कमी येणार आहे.विशेष म्हणजे या रुग्णालायात रुग्णांसाठी योगाभ्यास, करमणुकीसाठी कॅरम,टीव्ही आदी सुविधांसह रुग्णांना कुटुंबियांशी संवाद साधण्यासाठी दहा टॅब ठेवून त्याद्वारे व्हिडीओ कॉल करून कुटुंबियांशी संवाद साधत आपल्या उपचारासोबतच अडचणीबाबत माहिती देता येणार आहे.

या रुग्णालय परिसरात तब्बल ७५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून त्यांचे नियंत्रण करण्यासाठी कंट्रोल रूम बनविण्यात आले आहे.येथील रुग्णांना ऑक्सीजन पुरवठा कमी पडू नये यासाठी तब्बल तीन ऑक्सिजन टॅंक या ठिकाणी लावण्यात आले आहेत. रुग्णालयात दुर्घटना घडल्याच्या घटना लक्षात घेता काही शौचालय सुध्दा ऑक्सिजन युक्त केले आहेत.या रुग्णालयाची विशेषतः म्हणजे येथील रुग्णांसोबत काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स यांचा थेट संपर्क येणार नाही यासाठी वेगळा ‘ नर्स वे’ बनविण्यात आला आहे.त्या ठिकाणी पीपीई किट्स न घालता वेगळ्या वातावरणात त्यांना राहता येणार असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण राहणार नाही.येथील डॉक्टर्स ,नर्स वॉर्डबॉय यांची सेवा पुरविण्याची जबाबदारी खाजगी यंत्रणेवर सोपविण्यात आल्याने या ठिकाणी रुग्णसेवेवर कोणतेही परिणाम होणार नाही. याकडे लक्ष राहणार आहे. त्यासाठी चार शासकीय वैद्यकिय अधिकारी या सर्व कामांवर लक्ष ठेवणार आहेत.