पालिका मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहार प्रकरणी शासनाचे कारवाईचे निर्देश

भिवंडी : भिवंडी शहर महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय विभागातील प्रशासकीय अनियमितता व आर्थिक अपहारप्रकरणी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या शेट्टी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी तत्कालीन महापौर जावेद दळवी यांनी शासनाकडे केली होती.त्यामुळे शासनाने गंंभीर दखल घेऊन भिवंडी पालिकेच्या मुख्य लेखा परिक्षकांमार्फत गोपनीय चौकशी करून त्यांनी दिलेल्या अहवालानुसार तत्कालीन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या शेट्टी यांच्यावर आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी तातडीने कारवाई करून शासनाला अहवाल सादर करावा असे गोपनीय पत्र नुकतेच राज्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई विभागाचे सहसंचालक महेश बोटले यांनी महापालिका प्रशासनाला पाठविले आहे.त्यामुळे पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागात खळबळ माजली आहे.

भिवंडी पालिकेची सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय विभागाअंतर्गत शहरात विविध ठिकाणी १५ आरोग्य उपकेंद्र सुरू आहेत.या आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणा-या रूग्णांसाठी शासनाने दरवर्षी औषधांचा पुरवठा केला आहे.त्यापैकी २०१५ – १६ पासून सन २०१८-१९पर्यंत या विभागातील प्रशासकीय अनियमितता व आर्थिक अपहार तसेच शासनाकडून आलेल्या औषधांच्या नोंदीचे स्टॉक रजिस्टर व अनेक महत्वाचे दस्ताऐवज गहाळ करून आर्थिक अपहार केल्याची तक्रार भाजप व शिवसेना नगरसेवकांनी महापौर यांच्याकडे केली होती.त्यामुळे तत्कालीन महापौर जावेद दळवी यांनी दखल घेत शासनाकडे तक्रार केली आहे.त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या शेट्टी यांच्यासह  कर्मचारी व आरोग्य विभागातील डॉक्टर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.याबाबत शासनाने पालिकेचे तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांना या प्रकरणी गोपनीय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार आयुक्त हिरे यांनी पालिकेचे मुख्य लेखा परिक्षक कालिदास जाधव यांची  चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली.लेखापरिक्षक जाधव यांनी  या प्रकरणी सखोल गोपनीय चौकशी करून सुनावणी घेतली त्यामध्ये शासनाकडून आलेल्या औषधांच्या नोंदीचे स्टॉक रजिस्टर व अनेक महत्वाचे दस्ताऐवज डॉ.शेट्टी यांनी सादर केलेले नाही तर काही औषधे व दस्ताऐवज आगीमध्ये जळून खाक झाल्याचा बहाणा करण्यात आला आहे.मात्र याबाबत डॉ.शेट्टी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केलेली नाही.तसेच शासनाकडील सिव्हिल हॉस्पिटल ,डी.डी.ऑफिस ,डी.एच.ए.ऑफिस क्षयरोग ऑफिस पुणे आदींकडून आलेल्या लाखो रूपयांचा  औषधसाठा तसेच जन्म ,मृत्यू दाखल्यांबाबत प्रशासकीय अनियमितता व आर्थिक अपहार प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.शेट्टी यांच्यासह अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुनावणी घेतली असता ते देखील समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाहीत.त्यामुळे पालिकेचे मुख्य लेखा परिक्षक कालिदास जाधव यांनी गोपनीय चौकशी तपास अहवाल तयार करून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठवून दिला आहे.या अहवालाची पडताळणी करून राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई विभागाचे सहसंचालक महेश बोटले यांनी महापालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांना लेखी पत्र पाठवून अपहार प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.शेट्टी यांच्यावर कारवाई करून अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत.