एन.आर.सी आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद; काही महिलांसह कामगारांना अटक

मोहने येथे एनआरसी संघर्ष समितीच्यावतीने धरणे आंदोलन सुरू असून कामगारांना थकीत देणी मिळण्याबाबत परिसरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी, रिक्षा चालक आदींनी एक दिवसासाठी बंद देखील पुकारला होता.

  • कॉलनीतील तोडक कारवाईला महिलावर्गाने केला विरोध

कल्याण : एन.आर.सी.तील कामगार वसाहत आज पुन्हा तोडण्यास घेतल्याने संतप्त महिलांनी विरोध दर्शविल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाल्याने पोलिसांनी काही महिलांसह कामगारांना ताब्यात घेतले होते.

गेल्या आठवड्यापासून मोहने येथे एनआरसी संघर्ष समितीच्यावतीने धरणे आंदोलन सुरू असून कामगारांना थकीत देणी मिळण्याबाबत परिसरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी, रिक्षा चालक आदींनी एक दिवसासाठी बंद देखील पुकारला होता. कल्याण पश्चिमचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी धरणे आंदोलनात सहभाग नोंदवून व्यवस्थापनाच्या विरोधात आपण कामगारांच्या बाजूने असल्याचे सांगितले होते.

एनआरसी कामगार वसाहतीत रिकामे बंगले, इमारती तोडण्याचे काम आज पुन्हा सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात महिला वर्गाने त्याठिकाणी जाऊन कारवाईला विरोध केला. यामुळे खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी पोलीस बळाचा वापर करून महिलांना पोलीस ठाण्यात घेऊन गेल्याचा आरोप कामगार नेते अर्जुन पाटील अटाळीकर यांनी केला आहे.

दरम्यान मोहने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ व्यवस्थापनाच्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी दररोज शेकडो आंदोलनकर्ते ठिय्या धरून बसत आहेत.