District Collector reviews Thane District Rural Covid Center
ठाणे जिल्हा ग्रामीण कोविड सेंटरचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

  • मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच लोकार्पण

भिवंडी:  तालुक्यातील सावद ग्रामपंचायत क्षेत्रात उभारले जाणारे अत्याधुनिक कोविड रुग्णालय भविष्यात जिल्ह्याचे साथ रोग नियंत्रण रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होईल असे अत्याधुनिक रुग्णालय २ लाख ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेत बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून सध्या हे  अंतिम टप्प्यात आले आहे.

येत्या आठ दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी या कोविड सेंटरच्या कामांचा अंतिम आढावा ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेऊन या कोविड सेंटरच्या रुग्ण सज्जतेसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याची माहिती भिवंडी प्रांत अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी दिली आहे.या बैठकीस तहसीलदार शशिकांत गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे आदींसह विद्युत विभागाचे अधिकारी तसेच महसूल व पोलिस अधिकारी उपस्थित होते.

तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण व मृत्यु संख्या वाढत असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करणारी सक्षम आरोग्य यंत्रणा उभारली जावी अशी मागणी ग्रामीण भागातून करण्यात येत होती त्याची दखल भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करून भिवंडी- कल्याण या महामार्गावरील सावद ग्रामपंचायत क्षेत्रातील सदरचे गोदाम बांधकाम याची निवड केली आहे.हे ठिकाण भिवंडी, शहापूरसह कल्याण, मुरबाड, वाडा  या तालुक्यातील ग्रामीण भागासाठी देखील सोयीस्कर आहे. या जागेवर तब्बल ४० दिवसात हे रुग्णालय निर्माण करण्यात येत आहे. ३६० महिला, ३७९ पुरुष, ऑक्सिजन बेडच्या सुविधेसह ८० अतिदक्षता कक्षात २० व्हेंटिलेटर, २० बायपॅप व ४० हायफ्लो नॅशल कॅनॉल सुविधा असलेले बेड या ठिकाणी उपलब्ध केले आहेत.