अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडून लोकल रेल्वेचे स्वागत  पण ‘जात्यातले रडले सुपातले हसले’ अशी शहरात परिस्थिती

डोंबिवली : कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होवू नये म्हणून लॉकडाऊन अंतर्गत मुंबईची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळख असलेली प्रवासी लोकल रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. गेले ८४ दिवस

 डोंबिवली : कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होवू नये म्हणून लॉकडाऊन अंतर्गत मुंबईची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळख असलेली प्रवासी लोकल रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. गेले ८४ दिवस रेल्वेसेवा बंद असल्याने संपूर्ण कारभारच बंद झाला. लॉकडाऊनमध्ये मिळालेली सवलत आणि आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यासाठी सरकारी आणि खाजगी उद्योगांना १० टक्के व्यवहार सुरु करण्यास परवानगी मिळाली. पण याचा अत्यावश्यक सेवेवर ताण पडून वाहतूक कोंडीमुळे नव्या समस्या निर्माण होऊ लागल्याने अखेर केंद्र सरकारने राज्य शासनास अत्यावश्यक सेवेसाठी लोकक रेल्वे सेवा सुरु केली. यामुळे अत्यावश्यक सेवेतील प्रवाश्यांनी लोकलचे स्वागत केले असले तरी खाजगी नोकरीसाठी कामावर जाणाऱ्या नोकरदार रेल्वेच्या नावाने बोटे मोडीत आहेत. शहरात ‘जात्यातले रडले सुपातले हसले’ अशी सर्वसाधारण प्रतिक्रिया उमटत आहे.

डोंबिवली स्थानाकात आज सकाळी पहिल्या लोकलने प्रवेश केला तो क्षण मोठा विलक्षण अनुभव देणारा होता असे प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितले. एकूण ८४ दिवसानंतर प्रथमच लोकल पाहायला मिळाली. डोंबिवली स्थानक चारी बाजूंनी पूर्णपणे बंद करण्यात आले असून नेमके कोणत्या गेटमधून जायचे हा मुख्य प्रश्न पडला होता. सकाळी लोकलसाठी थोड्या प्रमाणात गर्दी झाली. स्थानिक रेल्वे प्रशासनाने स्थानकातील मुख्य पादचारी पूल बंद केल्याने काही काळ तणाव झाला. पूर्व-पश्चिम जाण्यासाठी एकमेव पादचारी पूल बंद केल्याने रेल्वे पोलीस आणि प्रवासी यांच्यात वादंग होऊन परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. पण त्यावर मार्ग काढून दिवा दिशेकडील पादचारी पूल मोकळा केला आणि पूर्वेकडील ‘बस’ मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांना मार्ग मिळाल्याने प्रवाशांनी सुस्कारा टाकला.

लोकल रेल्वे सुरु झाल्यामुळे काही प्रमाणात जरी सरकारी कर्मचाऱ्यांना वेगळा पर्याय मिळाला असला तरी मात्र इतर चाकरमान्यांचे मात्र आजही प्रचंड हाल होत आहेत. स्थानिक रेल्वे प्रशासनाने स्थानकात थर्मल तपासणी किंवा इतर तपासणी व्यवस्था केली नसल्याने अनेक प्रवासी प्रश्न विचारत आहेत. रेल्वेचा प्रवास धोकादायक नाही ना अशी विचारणा होत आहे. या विषयाचे निवेदन खासदार रेल्वे समन्वय समिती पदाधिकारी यांनी रेल्वे प्रबंधक आणि जी.आर.पी. डोंबिवली यांना दिले आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान असलेल्या प्रवेशद्वारपैकी फक्त दोन प्रवेशद्वारे रेल्वे प्रशासनाने मोकळी केली असून बाकी इतर ९ प्रवेशद्वारे बंद ठेवली असल्याने स्थानकात प्रवाशांची घुसखोरी होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. रेल्वेमुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायावर थोडाफार चांगला परिणाम झाला असू रिक्षा धावण्यास सुरुवात झाल्यामुळे रिक्षा चालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. याबाबत मात्र रेल्वे अधिकारी मात्र तणावात असून रेल्वेमुले कोरोना संसर्गप्रमाण वाढेल या भीतीत आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांचे कोविड १९ हॉस्पिटल पूर्णपणे भरले असून भायखळा येथील रूग्णाल्यातील इतर रुग्ण पूर्णपणे भरले असल्याने भीतीदायक परिस्थिती आहे. रेल्वे प्रवाशांची गर्दी झाली तर काय हाच विषय अधिकारी वर्गात चर्चिला जात आहे. तर बँक कर्मचारी आवश्यक सेवेत नाहीत का अस प्रतिप्रश्न करीत आहेत. बँकेतील कर्मचाऱ्यांनी कशी सेवा करायची आम्ही अत्यावश्यक नाही का, असे डोंबिवलीकर विचारात आहेत.