पुलाचे तोडकाम सुरु असताना पोकलनसह कोसळून एक कामगार जखमी

डोंबिवली : पूर्व-पश्चिम डोंबिवली शहराला जोडणारा पूर्वीचा एकमेव कोपर उड्डाणपूल धोकादायक झाल्यामुळे वाहतुकीसाठी गेले वर्षभर पूल बंद करण्यात आला होता. या उड्डाणपुलाचे तोडकाम पूर्ण झाले. मात्र

 डोंबिवली : पूर्व-पश्चिम डोंबिवली शहराला जोडणारा पूर्वीचा एकमेव कोपर उड्डाणपूल धोकादायक झाल्यामुळे वाहतुकीसाठी गेले वर्षभर पूल बंद करण्यात आला होता. या उड्डाणपुलाचे तोडकाम पूर्ण झाले. मात्र राजाजी अंडरपास पुलाचे तोडकाम सुरु असताना अचानक पोकलनसह कामगार खाली रस्तावर कोसळल्याने काही काळ भीती निर्माण झाली. परंतु या घटनेत कोणतीही मोठी हानी झाली नाही. पोकलन कामगार किरकोळ जखमी झाला असून त्याला वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ खाजगी रुग्णालयात पाठवल्याची माहिती मिळत आहे.

रेल्वेच्या पुष्पक रेल कन्स्टक्शन प्रा. लिमिटेड या ठेकेदाराला पुलाचे काम देण्यात आले असून गेले अनेक दिवस तोडकाम सुरु आहे. रेल्वे उड्डाणपुलाच्या स्लॅबचे संपूर्ण तोडकाम पूर्ण झाले असून आता पुर्वेकडील राजाजी अंडरपास पुलाचे तोडकाम सुरु आहे. आज सकाळी तोडकाम सुरु करण्यात आल्यानंतर अंडरपास पुलाचा अर्धा स्लॅब तोडल्यात आला. राजाजी पथ कन्या शाळेकडील स्लॅबचे तोडकाम चालू असतानाच अचानक पोकलन सह कामगार खाली कोसळल्याने धुळीचे लोट दिसून आल्याने घाबराट पसरली. दरम्यान रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे कोणतीही इतर हानी झाली नाही.

या घटनेबाबत मनसेचे स्थानिक नगरसेवक तथा माजी विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांनी सांगितले की, राजाजी अंडरपास पुलाचा बीम कट करीत असतानाच पोकलन स्लॅबसकट कामगार खाली कोसळला. मात्र या घटनेत त्याला किरकोळ दुखापत झाली. तोडकाम सुरु असतांना सुमारे १६-१७ कामगार काम करीत होते. काम व्यवस्थित चालू असून एकूण तोडकाम या महिन्याच्या शेवटपर्यंत नक्की पूर्ण होईल. काम एकही दिवस बंद नसल्याने कामाची गती निश्चित चांगली आहे. रेल्वे प्रशासनाच्या निर्देशानुसार ठेकेदार काम करीत असून येत्या ऑगस्टपर्यत कोपर उड्डाणपूल पूर्ण होऊन वाहतुकीस उड्डाणपूल सुरु होईल, असे वाटत आहे. तर पालिकेच्या खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्यापासून रेल्वेच्या काही मेल आणि एक्सप्रेस गाड्या सुरु होणार असल्याने कामाची गती वाढविल्याने ही किरकोळ घटना घडली. पण कोणतीही इतर हानी झाली नसल्याने काम पुन्हा सुरळीत सुरू झाले आहे. कोपर उड्डाण पूल नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह शहर अभियंता सपना कोळी-दवनपल्ली, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा, अतिरिक्त रेल्वे प्रबब्धक आशुतोष गुप्ता वरिष्ठ विभागीय अभियंता मळभागे आदी अधिक मेहनत घेत आहेत.