कोरोनाच्या भीतीमुळे मजूर पळून गेले, रेल्वे पादचारी पूलाचे काम रखडले !

प्रशांत जोशी, डोंबिवली : शहरात पुलाच्या समस्या निर्माण झाल्यामुळे प्रतिदिन विविध समस्यांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. कोपर उड्डाण पुलाचे पाडकाम सुरू करण्यात आल्याने डोंबिवलीकरांना

 प्रशांत जोशी, डोंबिवली : शहरात पुलाच्या समस्या निर्माण झाल्यामुळे प्रतिदिन विविध समस्यांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. कोपर उड्डाण पुलाचे पाडकाम सुरू करण्यात आल्याने डोंबिवलीकरांना हायसे वाटले. पण गेले दोन वर्ष कल्याण दिशेचा पादचारी पूल बंद आहे. नवीन पादचारी पुलाचे काम रडत-खडत सुरु आहे. परंतु आता कोरोनाच्या भितीने मजूर पळून गेल्यामुळे त्या पादचारी पुलाच्या कामावर गंडांतर आले आहे. ‘पाडकाम करणे सोपे आहे पण जोडकाम करणे कठीण आहे’ पुलाचे बांधकाम, गर्डरची कामे पूर्ण झाली असून आता मजुरांमुळे काम रखडणार आहे. पावसाळ्यानंतरच पादचारी पूलाचे काम सुरळीतपणे सुरु होईल अशी माहिती रेल्वे सुत्राकडून मिळत आहे. या परिस्थितीमुळे अजून किती महिने लाखो प्रवाशांची छळवणूक रेल्वे प्रशासन करणार, अशी विचारणा डोंबिवलीतून होत आहे.

गेल्या दोन-तीन वर्षात मुंबईतील विविध पूलांच्या अपघातांमुळे डोंबिवलीतील पूलांचे बांधकामांच्या शास्त्रीय तपासण्या संबंधीत शासकीय यंत्रणाकडून करण्यात आल्या. त्यानुसार कोपर उड्डाण पूल, ठाकुर्ली रेल्वे पादचारी पूल, डोंबिवली स्थानकातील कल्याण टोकाकडील पूलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. कोपर उड्डाण पूलाचे बांधकाम महापालिका रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने करीत आहे. या पूलाचे तोडकाम शुक्रवार पासून सुरु झाले. ठाकुर्ली पादचारी पूल एका रात्रीत उभा करण्यात आला. करोनामुळे टाळेबंदी सुरु असून उपनगरी रेल्वेला सुध्दा विराम मिळाला आहे. अशा वेळेस रेल्वे प्रशासन डोंबिवली स्थानकातील रखडलेल्या पूलाचे काम पुर्ण करेल अशी डोंबिवलीतील रेल्वे प्रवाशांना मानस होता. परंतु करोनाच्या भितीने आंध्र, कर्नाटक येथील मजूर पळून गेल्याने पूलाचे काम पावसाळ्यापर्यंत पुर्ण होणे शक्य नसल्याचे रेल्वे प्रशसानचा कयास आहे. कोपर पूलाचे तोडकाम करण्यात येत आहे. तोडकाम करण्यासाठी फारशा तांत्रिक बाबींची गरज नसते मात्र, पादचारी पूलासाठी अभियंता, तांत्रिक कर्मचारी, मजूर यांची गरज असते.
 
डोंबिवली स्थानकातून दररोज लाखो प्रवाशी प्रवास करित असतात. उपनगरी रेल्वे बंद असल्याने या टाळेबंदीचा उपयोग रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल बांधणीकरता करुन घ्यायला हवा होता. रेल्वे प्रशासनाने पादचारी पुलाच्या पायाचे बांधकाम पूर्ण केले आहे. फक्त फलाट क्रमाक चार वरील पायाचे बांधकाम बाकी आहे. पुलाचे गर्डर तयार असून तेही डोंबिवलीत कधीही येऊ शकतात. मात्र मजुरांमुळे पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. लॉकडाऊन दरम्यान जर पादचारी पूल पूर्ण झाला असता तर पावसाळ्यात प्रवाश्यांना दिलासा मिळाला असता असे डोंबिवलीतील रेल्वे प्रवाशांचे म्हणणे आहे. रेल्वे स्थानकात पूर्व-पश्चिम ये-जा करण्यासाठी फक्त एकच पादचारी पूल असल्याने त्याच पुलावर ताण पडत असल्याने भविष्यात गर्दीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.