स्मार्ट सिटीला विसंगत डोंबिवली औद्योगिक क्षेत्राची अवस्था – परदेशी पाहुण्यांसमोर शरमेने मान खाली जात असल्याची उद्योजकांची खंत

डोंबिवली : डोंबिवली औद्योगिक विभागाची स्थापना सहा दशकांपूर्वी झाली. मात्र तरीही या भागात रस्ते नाले, दिवाबत्तीची दुरावस्था दिसत आहे. डोंबिवली औद्योगिक विभाग उपेक्षित असून कधी काळी परदेशी पाहुणे

 डोंबिवली : डोंबिवली औद्योगिक विभागाची स्थापना सहा दशकांपूर्वी झाली. मात्र तरीही या भागात रस्ते नाले, दिवाबत्तीची दुरावस्था दिसत आहे. डोंबिवली औद्योगिक विभाग उपेक्षित असून कधी काळी परदेशी पाहुणे या भागाची पाहणी करायला येतात तेव्हा दुरावस्था बघून आमची मान खाली जाते अशी भावना उद्योजक व्यक्त करीत आहेत. 

राज्यात नवे उद्योग यावेत म्हणून शासन विविध सवलती देत आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र ही योजना तयार होत आहे ही आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. मात्र डोंबिवली औद्योगिक विभागात आज रस्ते नाहीत, स्वच्छता नाही, सांडपाणी वाहून न जाता ते कंपन्यांच्या बाहेर साचलेल असतं, दिवाबत्ती नाही असे असूनही उद्योजक अनेक अडथळे पार करत उत्पन्न वाढवीत आहेत. यामुळे सरकारला व स्थानिक स्वराज्य संस्थेला याचा लाभ होत आहे. पण त्यानुसार सुविधा मात्र नाहीत. डोंबिवली औद्योगिक विभाग प्रकाशात येतो तो फक्त प्रदूषणामुळे. एवढ्या पुरताच उल्लेख केला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
 
उद्योजक स्वतः कारखाने चालू करतात, वाढवतात आणि आपल्या सोबत कर्मचाऱ्यांचे संसार चालवतात. रोजगार निर्माण करतात. निर्यात करून परकीय चलन मिळवून देतात. विविध करांच्या माध्यमातून सरकारच्या करवाढीत मदत करतात.  ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली औद्योगिक क्षेत्र क्र. एक आणि दोनमधील सर्व उद्योग व्यवसाय आणि व्यावसायिक हे सर्व करूनही उपेक्षित आहेत. कारण आम्ही ‘डोंबिवली औद्योगिक ‘, क्षेत्रात व्यवसाय करत आहोत दुर्दैवाने डोंबिवली औद्योगिक क्षेत्राचा उल्लेख फक्त प्रदूषणाबद्दलच केला जातो अशी खंत व्यक्त होत आहे. शासकीय पातळीवर डोंबिवली औद्योगिक क्षेत्र  जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवले गेले आहे.
 
औद्योगिक वसाहतीची निर्मिती करतानाही या भागातील रस्त्यावर दिवाबत्तीची सोयच केली नाही. आज रस्ते अस्तित्वातच नाहीत. ज्यावेळी आमच्या कारखान्यात काही परदेशी व्यावसायिक भेटीला येतात त्यावेळी रस्त्यांशिवाय औद्योगिक क्षेत्र असू शकते यावर हास्यविनोद करतात. मग दुर्दैवाने एक भारतीय उद्योजक म्हणून आमची मान शरमेने खाली जाते अशी प्रतिक्रिया काही उद्योजक व्यक्त करीत आहेत.