भूमिगत नाल्यांच्या कामाला सुरुवात, चार ठिकाणी टाकण्यात येणार जलवाहिन्या

डोंबिवली : पावसाळ्यामध्ये पाणी साठून होणारे अपघात रोखण्यासाठी कल्याण शीळ मार्गावरील गोळवली हद्दीतील नेकणीपाडा, मयुर हॉटेल समोरील गोळवली-दावडी नाका, मुख्य गोळवली प्रवेशद्वार, पांडुरंगवाडी

 डोंबिवली : पावसाळ्यामध्ये पाणी साठून होणारे अपघात रोखण्यासाठी कल्याण शीळ मार्गावरील गोळवली हद्दीतील नेकणीपाडा, मयुर हॉटेल समोरील गोळवली-दावडी नाका, मुख्य गोळवली प्रवेशद्वार, पांडुरंगवाडी चंद्रहास हॉटेल अशा चार ठिकाणी गोळवली परिसरामध्ये मोठी सांडपाण्याचा निचरा होणारी वाहिनी टाकून मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा होण्यासाठीच्या कामाला कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांच्या पाठपुराव्याने सुरुवात करण्यात आली. या विभागात २०१२ मध्ये आलिया शेख या मुलीचा अशाच एका घटनेत अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तेव्हापासून सुधीर पाटील हे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. या कामांमुळे येथील हजारो नागरिकांना मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना, शेकडो व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात हे काम पूर्ण झाल्यास त्याचा लाभ येथील रहिवाशांना होणार आहे. याबाबत सुधीर पाटील सांगतात, काम करणे हे माझे कर्तव्य असून यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होतो. ठराविक अवधीमध्ये त्याची पूर्तता होणे यावर माझा भर असेल.