डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालय कोरोना संशयित रूग्णांसाठी दिल्याने गरोदर महिलांची परवड

प्रशांत जोशी, डोंबिवली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर रूग्णालय कोरोना संशयित रूग्णांसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे गरोदर महिलांची परवड होत असून डोंबिवलीतील

प्रशांत जोशी, डोंबिवली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर रूग्णालय कोरोना संशयित रूग्णांसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे गरोदर महिलांची परवड होत असून डोंबिवलीतील अनेक महिलांना रूक्मिणीबाई रूग्णालयात जाण्यासाठी सांगण्यात येत असून डोंबिवली येथील महिलांना कल्याण येथे जाण्यासाठी रूग्णावाहीकादेखील वेळेवर उपलब्ध होत नसल्याने गरोदर महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लगत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. विशेष म्हणजे शास्त्री नगर रूग्णालयात दिव्यावरून देखील महिला येत असून सध्यस्थितीत रूक्मिणीबाई रूग्णालयातदेखील जागा नसल्याने या महिलांना थेट कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात घेऊन जावे, असा सल्ला शास्त्रीनगर रूग्णालयातील डॉक्टरांकडून दिला जात आहे.

कल्याण डोंबिवली परिसरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे डोंबिवली येथील शास्त्रीनगर रूग्णालय कोरोना संशयीत रूग्णांसाठी वापरावे असे आदेश कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिले आहेत. मात्र याआधी हे रूग्णालय गरोदर महिलांसाठी अधिक वापरले जात असे. साधरणता वर्षाला ४ हजार ७०० प्रसूती या रुग्णालयात होत असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिकारी डॉ. सावकारे यांनी दिली.  मात्र सध्या  या रुग्णालयात गरोदर महिलांची परवड होताना दिसत असून अनेक महिलांना खाजगी रूग्णालयाचे पैसे देणे परवडणारे नाही. इतकेच नव्हे १५ दिवासपूर्वीपर्यंत तर काही समस्या उद्भवली तर कल्याण येथील रूक्मिणीबाई रूग्णालयात जावे असे सांगण्यात येत होते. आता मात्र रूक्मिणीबाई रूग्णालयात देखील रूग्णांची संख्या अधिक झाल्याने थेट कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात रूग्णाला न्यावे असे सांगण्यात येत आहे. इतकेच नव्हे गरोदर महिलांव्यतिरीक्त कोणत्याही रूग्णाला या रूग्णालयात नेले असता त्यांची हेळसांड होताना दिसत आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारे प्राथमिक उपचारदेखील केले जात नसल्याचा आरोप राहुल नवसागरे यांनी केला असून त्यांच्या कावीळ झालेल्या बहिणीवर  योग्य वेळेत उपचार न झाल्याने त्या दगावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे इतर रूग्णांसाठी तात्पुरत्या स्वरुपात तरी कोणत्या तरी रुग्णालयाची सोय पालिकेने करून देणे आवश्यक असल्याची मागणी रूग्ण करत आहेत.