कोरोना परिषदेत राजकारण आणू नका – राजेश मोरे

डोंबिवली : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महापालिका परिक्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाचे(corona) संक्रमण मोठ्या प्रमाणात होत असून रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे शहरात भितीचे वातावरण आहे. यावर नियंत्रण कसे ठेवता येईल म्हणून बुधवारी लाल बावटा युनियनचे नेते कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी सर्वपक्षीय कोरोना परिषदेच्या(corona conference) आयोजन केले होते. परिषदेत विविध उपाययोजना मांडण्यात आल्या. मात्र अचानक विषयांतर करून राजकारण म्हणून आयुक्त हटाव भूमिका समोर मांडण्यात आली. परिषदेची ही भूमिका मान्य नाही. कोरोना काळात कोणीही राजकारण करू नये. कोरोना हद्दपार झाला पाहिजे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कामा करू, असे आवाहन शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी केले आहे.

याबाबत राजेश मोरे यांनी पत्रकारांना सांगितले की, डोंबिवली शहरातून चांगल्या कार्याचा प्रारंभ प्रथम होत असतो आणि अशी भरपूर उदाहरणे आहेत हे माहित असल्याने देशातून प्रधमच होणाऱ्या कोरोना परिषदेला आवर्जून उपस्थित राहिलो. परिषदेत आमदारांनी तसेच विविध नेत्यांनी कोरोनावर मात करण्याबाबतच्या चांगल्या संकल्पना मांडल्या. दरम्यान कोरोना परिषदेचा उद्देश सफल होईल असे वातावरण असतानाच अचानक कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांना टार्गेट करून परिषदेत राजकारण आणल्याने परिषदेचा मुख्य उद्देश सफल झाला नाही. ही घटना पूर्णपणे चुकीची वाटल्याने इच्छा नसताना परिषदेतून बाहेर गेलो.

मुळात कोरोना संक्रमणावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करून कोरोना रुग्ण कमी कसे होतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. डॉक्टर, पोलीस आणि पालिका कर्मचारी यांना सहकार्य केले पाहिजे. सर्व पक्षीय लोकांनी तसेच नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे कारण कोरोना मुक्त करणे हे एकट्याचे काम नाही. आयुक्त सर्व माध्यमातून आवाहन करीत असतात. प्रत्यके विभागात त्या विषयाची माहिती दिली जात आहे. डोंबिवली शहरात अनेक उच्च साधनांसह कोविड रुग्णालये उभारण्यात आली असून त्या रुग्णालयात रुग्ण सेवा मिळत आहे. काही बाबतीत जर समस्या समोर येत असतील तर त्या सर्व मिळून सोडविल्या पाहिजेत. शहरातील आमदार तसेच इतर सर्व पक्षीय नेत्यांनी राजकारण विरहित एकत्र येऊन काम करणे ही काळाची गरज आहे.