बनावट कागदपत्रांद्वारे ई-पास बनवून देणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

कल्याण : एकीकडे लॉकडाऊनचा सायबर गुन्हेगार गैरफायदा घेत असतानाच दुसरीकडे बनावट कागदपत्रांद्वारे ई- पास बनवून देणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डीसीपी झोन ३ च्या ई पास पडताळणी

 कल्याण : एकीकडे लॉकडाऊनचा सायबर गुन्हेगार गैरफायदा घेत असतानाच दुसरीकडे बनावट कागदपत्रांद्वारे ई- पास बनवून देणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डीसीपी झोन ३ च्या ई पास पडताळणी पथकाच्या निदर्शनास हा सर्व प्रकार आला.

प्रतिबंधित क्षेत्रातून दुसरीकडे जाण्यासाठी संबंधित व्यक्तीजवळ ई-पास असणे बंधनकारक आहे. त्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईटवर एक विशेष फॉर्म बनवण्यात आला असून त्यात वैद्यकीय प्रमाणपत्रासह आवश्यक ती कागदपत्रे आणि माहिती भरल्यास हा ई-पास जारी केला जातो. मात्र सध्या अनेक परराज्यातील मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी इच्छुक आहेत. अशा हतबल लोकांकडून पैसे उकळून बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांना ई-पास बनवून दिले जायचे. खडकपाडा परिसरात असणाऱ्या सायबर कॅफेमधून हा सर्व प्रकार सुरू होता. लोकांच्या असहाय्यतेचा आणि अज्ञानाचा गैरफायदा हे सायबर कॅफेचालक घेत होते.मात्र कल्याण परिमंडळ डीसीपी 3 च्या ई पास पडताळणी पथकाच्या निदर्शनास हा सर्व प्रकार आला आणि या कृत्याचा पर्दाफाश झाला. विशेष म्हणजे कल्याणच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तींना कल्याणमध्ये राहत असल्याचे बनावट कागदपत्रांद्वारे दाखवले जात होते. या लोकांनी आतापर्यंत किती जणांना असे पास बनवून दिले आणि यामध्ये आणखी कोण सहभागी आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी डीसीपी झोन ३ च्या ई पास पडताळणी पथकातील पीएसआय अजिंक्य धोंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.