सोसायटीच्या कचऱ्याचा डबा नेला उचलून – महापालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांचा प्रताप सीसीटीव्हीत कैद

कल्याण : शहरातील कचरा उचलणाऱ्या महापालिकेच्या घंटागाडीतील कर्मचाऱ्यांनी कचरा उचलण्याबरोबरच कचऱ्याचा डबाही उचलून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण पश्चिमेतील आंबेडकर रोडवर असणाऱ्या सनराईज

 कल्याण : शहरातील कचरा उचलणाऱ्या महापालिकेच्या घंटागाडीतील कर्मचाऱ्यांनी कचरा उचलण्याबरोबरच कचऱ्याचा डबाही उचलून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण पश्चिमेतील आंबेडकर रोडवर असणाऱ्या सनराईज गॅलेक्सी सोसायटीमध्ये हा प्रकार घडला असून  हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यामुळे कचऱ्याचा डबा उचलून नेल्याने आता ओला आणि सुका  कचरा वेगळा कसा करायचा ? हा प्रश्न तर सोसायटीच्या सभासदांना पडला असून कचऱ्याचा डबा परत विकत घेण्याचा भुर्दंडही त्यांना सोसावा लागणार आहे.

घडलेल्या या सर्व प्रकाराबाबत रहिवासी इरफान शेख यांनी संबंधित कंत्राटदाराला जाब विचारला. मात्र त्याच्याकडून, मला याबद्दल काही माहीत नाही. असे उत्तर मिळाल्याचे इरफान शेख यांनी सांगितले. दरम्यान एकीकडे महापालिकेने कचरा वर्गीकरण बंधनकारक केले असून लॉकडाऊनच्या काळात लोकांनी मोठ्या मुश्किलीने हे कचऱ्याचे डबे आणले होते. अशा परिस्थितीत कुंपणच जर शेत खायला लागले तर नागरिकांनी करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.