लॉकडाऊनमुळे पालघर जिल्ह्यात अडकलेल्या ३४,८१६ नागरीकांना देण्यात आले ई- पास – जिल्हाधिकारी

पालघर : आपका ई-पास या प्रणालीवर प्राप्त झालेल्या अर्जांनुसार ई -पास नागरिकांना देण्यात येत असून लॉकडाऊनमुळे पालघर जिल्ह्यात अडकलेल्या ३४८१६ नागरीकांना ई -पास देण्यात आले असल्याची माहिती

पालघर : आपका ई-पास या प्रणालीवर प्राप्त झालेल्या अर्जांनुसार ई -पास नागरिकांना देण्यात येत असून लॉकडाऊनमुळे पालघर जिल्ह्यात अडकलेल्या ३४८१६  नागरीकांना ई -पास देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे. लॉकडाऊनमुळे पालघर जिल्ह्यात अडकलेल्या नागरीकांनी राज्यांतर्गत व राज्याबाहेर स्वत:च्या वाहनानं प्रवास करण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केलेले होते. आपका ई-पास या प्रणालीवर आजपर्यंत १८,२९९ परवानग्या देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या लिंकवर प्राप्त झालेल्या अर्जानुसार १६,५१७ इतक्या परवानग्या देण्यात आल्या आहेत.एकूणच जिल्हा प्रशासनाकडून खाजगी वाहनाने प्रवास करणाऱ्या एकूण ३४,८१६ इतक्या परवानग्या देण्यात आल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाकडे स्थलांतरित मजूरांनी राज्याबाहेर रेल्वेनं जाण्यासाठी केलेल्या अर्जाची संख्या : बिहार-१३६२७,  उत्तरप्रदेश – ९७२९४,  राजस्थान – ४६१२,  झारखंड – २९२८, ओडिशा – २७२०, छत्तीसगढ़ – १३३,  तामिळनाडू – २१४, मध्यप्रदेश – ३१८४.

पश्चिम बंगालमध्ये जिल्ह्यातल्या अडकलेल्या नागरिकांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू : जिल्ह्यातल्या पश्चिम बंगालमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना परत आणण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. आज ११ नागरिक विक्रमगड इथे परत येतील तर २३ नागरिक लवकरच जिल्ह्यात दाखल होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले आहे.

पालघर जिल्ह्यातून जे स्थलांतरित मजूर पायी चालत जात आहेत. किंवा टेम्पो,  ट्रकच्या माध्यमातून प्रवास करत आहेत त्यांना अडवून त्यांची तात्काळ निवारा कॅम्पमध्ये व्यवस्था करण्याबाबत आणि  त्यांना एस.टी बस किंवा श्रमिक रेल्वेनं संबंधित राज्यात पाठविण्या बाबत चे आदेश जिल्हातल्या सर्व तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहेत.  आतापर्यंत उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश,  राजस्थान या ३-राज्यांसाठी ८ श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्यात.  उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांसाठी नवीन ट्रेन सोडण्यासाठी मंजूरी मिळाली आहे. तर ओडिशा राज्यांकडे मंजूरी प्रलंबित आहे. यापुढे ही मागणी प्रमाणे संबंधित राज्यांची मंजूरी घेऊन ट्रेन सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच मध्यप्रदेशात जाणाऱ्या मजूरांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे मध्यप्रदेश राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे. परराज्यातील मजूरांना त्यांच्या राज्यात श्रमिक रेल्वेनं पाठविण्यासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री सहायता निधीमधून ३ कोटी रुपयांचा निधी पालघर जिल्हा प्रशासनाला मिळाला आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यात मागेल त्याला काम देण्यात येत आहे. आज रोजी जिल्ह्यात २६७७ कामे सुरु असून या कामावर ३८८०३ इतके मजूर उपस्थित आहेत. जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये कामे उपलब्ध करुन देण्याबाबत तक्रारी आल्या होत्या होत्या. त्या ठिकाणी संबंधित तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि संबंधित यंत्रणांना नियोजन करुन तात्काळ कामं उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यानं ३२ टँकर्सद्वारे ३० गावांना आणि ८४ पाड्यांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात ज्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होऊन टैंकरची मागणी केली जाते. अशा ठिकाणी तात्काळ टैंकर पुरवण्याच्या संदर्भात संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा जिल्हा परिषद यांना सुचना देण्यात आल्या असल्याचं  जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यात ज्या ठिकाणी लॉकडाऊन आदेश शिथील करण्यात आलेत. त्या ठिकाणी नागरीकांनी सामाजिक अंतर पाळावं, तसचं वाहनांचा कमीत कमी वापर करावा. मागील दोन-तीन दिवसामध्ये जिल्ह्यात १० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोना विषाणूच्या संक्रमण झाल्याच्या केसेस मध्ये वाढ दिसून येत आहे. त्यामुळे लोकांनी लॉकडाऊन आदेशाचं पालन करुन जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केलं आहे.