नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

देशभरात विविध राज्यांमधील विमानतळांचे नामकरण तेथील महान नेत्यांच्या नावाने करण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबईत होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे करावे. त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवून केंद्रीय स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करावी अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

ठाणे : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतीपथावर असून सिडकोच्या माध्यमातून हे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या विमानतळाचे स्वप्न अखेर पूर्ण होणार असल्याने या विमानतळाला “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे नाव द्यावे अशी मागणी नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच निर्धारित वेळेत जनतेच्या सेवेत हे विमानतळ रुजू करण्यासाठी सिडको कटिबद्ध असल्याचे देखील शिंदे यांनी सांगितले..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडी सरकार कार्यरत आहे. मंत्रालयावर भगवा फडकवण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आपण पूर्ण केलेत आणि बाळासाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहात, कोरोनासारख्या कठीण काळातही राज्याच्या विकासाच्या गाडीचा वेग मंदावू न देण्याची दक्षता आपण घेतलीत, याची प्रचिती उद्योग क्षेत्राशी संबंधित नुकत्याच झालेल्या ६१ हजार कोटी रुपयांहून अधिकच्या सामंजस्य करारांवरून महाराष्ट्राला आली आहे.

तसेच आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विविध विकास प्रकल्पांची कामे धडाक्यात सुरू आहेत. यातीलच एक प्रकल्प आहे नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ. सिडकोच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. या विमानतळाला आमचे दैवत असलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी विनंती शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

देशभरात विविध राज्यांमधील विमानतळांचे नामकरण तेथील महान नेत्यांच्या नावाने करण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबईत होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करावे. त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवून केंद्रीय स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करावी अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.