कल्याण परिमंडळात वीजबिल भरणा केंद्र सुरु – नियमांचे पालन करून वीज बिल भरण्याचे महावितरणचे आवाहन

कल्याण :लॉकडाऊनमुळे महावितरणच्या कल्याण परिमंडळात २७ मार्चपासून बंद असलेली वीजबिल भरणा केंद्र आता सुरु होत आहेत. 'कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व खबरदारी व प्रशासनाने आखून दिलेले

कल्याण : लॉकडाऊनमुळे महावितरणच्या कल्याण परिमंडळात २७ मार्चपासून बंद असलेली वीजबिल भरणा केंद्र आता सुरु होत आहेत. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व खबरदारी व प्रशासनाने आखून दिलेले नियम पाळून प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी बिल भरणा केंद्र सुरु करण्यात येत आहेत. सुरक्षित अंतर राखून नियमांचे पालन करत वीजबिलांचा भरणा करण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी परिमंडलातील ग्राहकांना केले आहे. 

कल्याण परिमंडलात गेल्या दोन महिन्यांपासून वीजबिल भरणा केंद्र बंद असल्याचा मोठा आर्थिक फटका महावितरणला बसला आहे. एप्रिल महिन्यात ४२८ कोटी  रुपयांचे वीजबिल वसूल होणे आवश्यक असताना केवळ ५५ टक्के म्हणजेच २३७ कोटी रुपये वसूल होऊ शकले. मे महिन्यात वीजबिल वसुलीत आणखी घट झाली असून ७७३ कोटींपैकी आतापर्यंत अवघे १४० कोटी रुपये (१८ टक्के) वसूल झाले आहेत. डिजिटल माध्यमातून वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करणाऱ्या ग्राहकांकडूनच हा महसूल मिळू शकला.  आर्थिक नुकसान टाळण्यासाठी महावितरण व्यवस्थापनाच्या निर्देशानुसार आता स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्यात येत आहेत. कल्याण मंडल कार्यालय दोन अंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २८ मे रोजी भरणा केंद्र सुरु होतील. तर पालघर जिल्हा व वसई-विरार महापालिका क्षेत्रात २६ मे पासून बिल भरणा केंद्र सुरु करण्यात आली आहेत. कल्याण मंडल एक अंतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मनपा आयुक्तांच्या परवानगीनंतर बिल भरणा केंद्र सुरु होतील. कर्मचाऱ्यांना मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटाइजर आदी प्रतिबंधात्मक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून ग्राहकांनी शारीरिक अंतर राखावे, यासाठी मार्किंग करण्यात आले आहे. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी पालघर, तारापूर, वसई आणि वाडा परिसरातील औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी व औद्योगिक ग्राहकांशी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. देखभाल-दुरुस्तीची कामे व अखंडित वीज पुरवठ्याबाबतच्या उपाययोजना संदर्भात त्यांनी माहिती दिली. तसेच उद्योजकांना येत असलेल्या विजेसंदर्भातील अडचणी जाणून घेत संबंधित अभियंत्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.