गरीबांची वीजबिले माफ करण्याची व मध्यमवर्गीयांना वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याची मराठी भारतीची मागणी

कल्याण : गेल्या अनेक दिवसांपासून वाढीव विजबिलामुळे सामान्य लोकांनाच नाही तर सेलिब्रेटींनाही धक्का बसला आहे. कोणत्याही प्रकारची रिडींग न घेता जवळपास दुपटीच्या घरात वीजबिल पाठविण्यात आले आहे. या

 कल्याण : गेल्या अनेक दिवसांपासून वाढीव विजबिलामुळे सामान्य लोकांनाच नाही तर सेलिब्रेटींनाही धक्का बसला आहे. कोणत्याही प्रकारची रिडींग न घेता जवळपास दुपटीच्या घरात वीजबिल पाठविण्यात आले आहे. या सगळ्या गोंधळात महाराष्ट्राच्या जनतेला अनेक मानसिक तणावातून देखील जावे लागले आणि त्यामुळे मराठी भारतीने हा मुद्दा लावून धरला होता, तसेच मुख्यमंत्री यांना फेसबुक, ट्विटर आणि इमेलद्वारे पत्र पाठवून मागणी केली होती की, लवकरात लवकर हा गोंधळ सोडविण्यात यावा. त्यानंतर तात्काळ मुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला निर्देश दिले त्याबद्दल आपले आभारी असल्याचे मराठी भारती संघटनेच्या राज्याध्यक्षा अॅड पूजा बडेकर यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला निर्देश जरी दिले तरी सध्या लोकांकडे गेले ३ महिने कोणताच रोजगार नाही. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या वीजबिलात ५० टक्के सवलत देण्यात आली पाहिजे, तसेच जे गोरगरीब आहेत त्यांचे वीजबिल माफ केले पाहिजे व ज्या सामाजिक संस्था आहेत. त्यांचे संपूर्ण बिल माफ केले पाहिजे, तसेच जोपर्यंत या प्रश्नांचे निराकरण होत नाही तोपर्यंत वीज बिल भरण्यास कोणतीही सक्ती करण्यात येऊ नये, अशा मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केले असल्याचे संघटनेच्या कार्याध्यक्षा विजेता भोनकर यांनी सांगितले.

कोरोनाच्या या महामारीच्या काळात लोकांना खाण्यापिण्याची सोय नाही आहे तिथे वीज बिल कुठून भरणार लोक? हा साधा प्रश्न सरकारच्या ध्यानी आला नसावा का अशी विचारणा मराठी भारतीचे संघटक राकेश सुतार यांनी केली तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात बिल पाठवून लोकांचे मानसिक ताण वाढविण्याचे काम सरकारने केले असल्याच्या आरोप कार्यवाह अनिल हाटे यांनी केला आहे. ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण न होता वीजबिल भरण्याची कोणतीही सक्ती झाली अथवा वीज खंडित करण्याचे जर कंपन्यांकडून आले तर मराठी भारती घंटानाद आंदोलन करेल असा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष आशिष गायकवाड यांनी दिला असल्याचे प्रवक्ता सोनल सावंत यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.