दोन अडीच महिन्याच्या वीज वापरानुसार वीजबिलाचे वाटप

डोंबिवली : कल्याण परिमंडलात लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिने बंद असलेले वीज मीटर रीडिंग व वीजबिलाचे वाटप महावितरणकडून सुरु करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रीडिंगनंतर

 डोंबिवली : कल्याण परिमंडलात लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिने बंद असलेले वीज मीटर रीडिंग व वीजबिलाचे वाटप महावितरणकडून सुरु करण्यात आले आहे.  प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रीडिंगनंतर ग्राहकांच्या गेल्या दोन-अडीच महिन्याच्या वीज वापरानुसार अचूक व एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. वीजबिलाचे प्रतिमाह विभाजन करून वीज वापराप्रमाणे मिळणारा स्लॅब बेनेफिटही देण्यात आला आहे. ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे. कल्याण परिमंडलात लॉकडाऊन कालावधीत केवळ लघुदाब ग्राहकांकडे तब्बल २२१ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. त्यामुळे महावितरणची आर्थिक अडचण वाढली असून ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे. वीजबिलाची दुय्यम प्रत मिळवणे व बिलाच्या दुरुस्तीसाठी वीज ग्राहक महावितरणच्या विविध कार्यालयात सध्या गर्दी करत आहेत. नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ‘एसएमएस’ दाखवूनही बिल भरणा केंद्रात वीजबिल भरता येते. त्यासाठी आपला मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदवावा. वीजबिल भरणा व अधिक बिलाच्या तक्रारीसाठी महावितरणचे www.mahadiscom.com हे संकेतस्थळ किंवा ग्राहकांसाठीचे मोबाईल अॅप यांचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले.