बेरोजगारांना वेबसाईटच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी ; राज ठाकरे यांच्या हस्ते वेबसाईटचे लाँचिंग

कल्याण : आज कोरोनामूळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. अशा बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी मनसे डोंबिवलीने पुढाकार घेतला आहे. "एमएनएस रोजगार डॉट कॉम

कल्याण : आज कोरोनामूळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. अशा बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी मनसे डोंबिवलीने पुढाकार घेतला आहे. “एमएनएस रोजगार डॉट कॉम (www.mnsrojgar.com)” या वेबसाईटच्या माध्यमातून गरजूंना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्यांच्याहस्ते आज या वेबसाईटचे लाँचिंग करण्यात आले. मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील आणि कल्याण ग्रामीण अध्यक्ष मनोज घरत यांच्या संकल्पनेतून ही वेबसाईट बनवण्यात आली आहे.

कोरोनामुळे गेल्या ३ महिन्यांपासून देशाबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचे आर्थिक चक्र बिघडले आहे. लॉकडाऊन जसजसा वाढत गेला तस तसं अनेकांच्या रोजगार,व्यवसाय आणि नोकऱ्यांवर संक्रांत आली. मात्र प्रत्येक संकट हे नविन संधी घेऊन येत असतं यादृष्टीने विचार करत मनसेने ही वेबसाईट बनवून महाराष्ट्रातील मराठी तरुणांसाठी नोकरी-व्यवसायाची दारं उघडी करून दिली आहेत. 

या वेबसाईटच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण तरुणींना रोजगार तर दिला जाईलच पण त्याचबरोबर उद्योग-व्यवसाय करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांनाही त्याद्वारे भविष्यात मदत केली जाणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. 

तर परप्रांतीय कामगार आपापल्या गावाला गेल्याने आज महाराष्ट्रातील प्रत्येक एमआयडीसीमध्ये मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ज्यामध्ये कुशल आणि अकुशल अशा दोन्ही वर्गातील मनुष्यबळाची मोठी गरज भासत आहे. या सर्व प्रकारच्या संधी मनसे या वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार असल्याचे कल्याण ग्रामीण अध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी सांगितले.दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त या वेबसाईटचे लाँचिंग करण्यात आले असून या उपक्रमाचे कौतुक करत त्याला राज ठाकरे यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.