महाराष्ट्रातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांवर उपासमारीची वेळ – न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा

कल्याण : लॉकडाऊनमुळे सर्वच शाळा बंद असल्याने अनुदानीत शासनमान्य शाळेतील सर्व शिक्षकांचे पगार सुरू असतांना राज्यातील विनाअनुदानित इंग्रजी तसेच मराठी माध्यमाच्या शाळांच्या शिक्षकांवर

 कल्याण : लॉकडाऊनमुळे सर्वच शाळा बंद असल्याने अनुदानीत शासनमान्य शाळेतील सर्व शिक्षकांचे पगार सुरू असतांना राज्यातील विनाअनुदानित  इंग्रजी तसेच मराठी माध्यमाच्या शाळांच्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या सीबीएससी, आयसीएसई, आयबी आणि स्टेट बोर्ड या शाळांच्या संस्था चालकांनी आपली मनमानी सुरू केली असून राज्यातील बहुतांश शाळांनी मार्च, एप्रिलपासून शिक्षकांना पगार देणे बंद केलेले आहे.

या शिक्षकांना संस्था स्तरावर मानधन स्वरूपात पगार दिला जातो. अनेक वर्षांपासून शिक्षक या शाळांमध्ये कार्यरत आहेत. पगार न झाल्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र राज्य क्रीडा संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार, सचीव अविनाश ओंबासे, कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष अनिल बोरनारे,  प्रा.उदय नाईक यांनी  मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदन देऊन शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी विनंती केली आहे. लवकरात लवकर निर्णय घेऊन राज्यातील शिक्षकांना न्याय द्यावा, अशी विनंती केली आहे. शिक्षकांना न्याय मिळाला नाही तर समीतीचे सर्व पदधिकारी लक्षम इंगळे, गुलाबराव पाटील, सुप्रिया नायकर, महादेव शिरसागर, कृष्णा माळी, विलास वाघ, अनिल शेजवळ, दशरथ आगवणे, गजानन वाघ, संतोष पाठक, विजय सिन्ह, सागर कावळे, आणि इतर सर्व सदस्य सोशियल डिस्टन्सिंगचा वापर करून उपोषणाला बसण्याची तयारी करत असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांनी सांगितले.