रशियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांकडून गणरायाची प्रतिष्ठापना

कल्याण : विद्येची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना भारतासोबतच परदेशात देखील केली जात असून रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी देखील लाडक्या बाप्पाला आपल्या हॉस्टेल मध्ये विराजमान केले आहे.

रशिया देशातील मॉस्को येथील तांबोव या शहरात तांबोव राज्य वैद्यकीय विद्यापीठात भारतातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असून हे विद्यार्थी परदेशात जरी असले तरी आपल्या लाडक्या बाप्पाची त्यांना ओढ आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी भारतातूनच गणरायाच्या मुर्त्या नेल्या असून गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या रिलेवा ५२ या हॉस्टेलमध्ये विधिवत प्रतिष्ठापना देखील करण्यात आली.

देश असो वा परदेश मनात भक्ती भाव असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे. पाच दिवस मनोभावे पूजा अर्चा करून या मूर्तीचे बादली मध्ये विसर्जन करणार असल्याची माहिती कल्याणची रहिवासी असलेल्या आणि तांबोव राज्य वैद्यकीय विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या नम्रता चौधरी या विद्यार्थीनीने दिली.