वीजबिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कल्याण परिमंडळात अतिरिक्त मनुष्यबळ

कल्याण : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मीटर रिडींग घेऊन वीज ग्राहकांना वीज वापरानुसार तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल दिले असता वाढीव बिलाच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांना वीजबिल आकारणी समजून

कल्याण : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मीटर रिडींग घेऊन वीज ग्राहकांना वीज वापरानुसार तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल दिले असता वाढीव बिलाच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांना वीजबिल आकारणी समजून सांगणे व संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या कल्याण परिमंडळात अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात येत आहे. महावितरणकडून उपलब्ध सुविधांचा वापर करून आपापल्या वीजबिलाची पडताळणी करावी व यात त्रुटी आढळल्यानंतरच तक्रार करावी, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी कल्याण परिमंडळातील वीज ग्राहकांना केले आहे. ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार ग्राहक सुविधेसाठी कल्याण परिमंडळात नियोजन करण्यात येत आहे.

ठाणे व पालघर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून आदेशित नियमांची अंमलबजावणी व शारीरिक अंतराचे पालन अनिवार्य ठरते. ही बाब लक्षात घेऊन वाढीव वीजबिलाच्या तक्रारी असणाऱ्या ग्राहकांसाठी महावितरणने www.mahadiscom.in हे संकेतस्थळ व https://billcal.mahadiscom.in/consumerbill/  या लिंकवर केवळ ग्राहक क्रमांक नमूद करून आपले वीजबिल तपासण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्लॅब बेनेफिटसह यापूर्वी भरलेल्या वीजबिलाची कपात करून रिडींगनुसार दिलेली बिले कशी योग्य आहेत, हे पडताळणीतून स्पष्ट होऊ शकते. बुधवारी  परिमंडळ कार्यालयात आलेल्या विविध लोकप्रतिनिधी व शिष्टमंडळांना मुख्य अभियंता अग्रवाल, अधीक्षक अभियंते धर्मराज पेठकर व सुनील काकडे यांनी लॉकडाऊन कालावधीतील वीजबिल आकारणी व आकारलेले वीजबिल कसे योग्य आहे, यासंदर्भात माहिती दिली. तसेच अधीक्षक अभियंते किरण नगावकर व मंदार अत्रे (प्रभारी) हे अनुक्रमे पालघर व वसई मंडलात ही भूमिका निभावत आहेत. याशिवाय परिमंडळात शाखा ते विभागीय कार्यालय व ग्राहकांच्या सोयीच्या ठिकाणी वीज ग्राहकांचे मेळावे आयोजित करून वीजबिलाची माहिती देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी संबंधीत कार्यालयातील काऊंटरची संख्या वाढविण्यात येत असून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय सर्व ग्राहकांना वीजबिलाचे सविस्तर विवेचन देणारी लिंक व माहिती ‘एसएमएस’वर पाठविण्यात येत असून ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संपर्क साधून वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. परिमंडळातील वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे.