झोपडपट्टीतील सार्वजनिक अस्वच्छ शौचालयामुळे कोरोना संक्रमण पसरण्याची भिती

डोंबिवली : शहरात अनेक ठिकाणी कोरोना संसर्गामुळे परिस्थिती भीषण झाली आहे. आतापर्यंत अस्वच्छतेचं माहेरघर असलेल्या एकाही झोपडपट्टीत करोनाने प्रवेश केला नव्हता. मात्र शेलार नाका जवळलील

 डोंबिवली : शहरात अनेक ठिकाणी कोरोना संसर्गामुळे परिस्थिती भीषण झाली आहे. आतापर्यंत अस्वच्छतेचं माहेरघर असलेल्या  एकाही झोपडपट्टीत करोनाने प्रवेश केला नव्हता. मात्र शेलार नाका जवळलील त्रीमूर्तीनगर येथील एक रिक्षा चालक कोरोना बाधित झाला आहे. या भागात सार्वजनिक स्वच्छतागृहांची  (शौचालय) अवस्था अंत्यत वाईट आहे. ही  अस्वच्छ शौचालये संक्रमणाची केंद्र ठरण्याची भिती या भागातील रहिवाशी व्यक्त करित आहेत.

पालिकेच्या ‘फ’ प्रभागाच्या वतीने प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांनी रुग्ण सापडताच त्रिमूर्ती नगरात निर्जंतुक फवारणी मोहीम राबविली. मात्र डोक्यावर असणारे कोरोनाचे संकट, पावसाळा , साथ रोग पसरणाऱ्या दाटीवाटीच्या  झोपडपट्ट्या असलेल्या भागात रुग्ण वाढू नये यासाठी प्रशासनाला विशेष मेहनत करावी लागणार आहे.

शेलार नाका, इंदिरा नगर, त्रिमूर्ती नगर येथील सार्वजनिक शौचालयांची असलेली दुर्दशा हा विषय माध्यमातून अनेक वेळा चव्हाट्यावर आला असतानाही याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अनेक वेळा झाला. यासाठी उपोषण, आंदोलने केली गेली मात्र तरीही याकडे दुर्लक्ष केले गेले.

याबाबत भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे म्हणाले की, येथील गोरगरीब जनतेसाठी साधी शौचालय व्यवस्था पालिका करू शकत नाही ही शरमेची गोष्ट आहे. अनेकवेळा आयुक्तांनी आश्वसने देऊनही कामे होत नाहीत. दलितवस्ती निधीचा वापर नक्की कुठे होतो यात किती भ्रष्ट्राचार होत असेल याची सर्व चौकशी केली पाहिजे. जर या वस्तीत कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला तर त्याचा संपूर्ण शहराला विळखा बसेल याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे. तर आरपीआयचे डोंबिवली अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी सांगितले की, पालिका प्रशासन गरिबांना नाहक त्रास देत आहे. काही प्रमाणात आम्ही स्वतः येथील गोरगरिबांसाठी कामे केली पण ती अपुरी पडत आहेत. 

झोपडपट्टीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी  सामाजिक वावर या नियमनाला येथील शौचालयांमुळे खिळ बसणार असून संक्रमण झाल्यास कोण जबाबदार अशी विचारणा येथील रहिवाशी करित आहेत. पालिकेच्या वतीने येथे जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या रहिवाशांना हातावर शिक्के मारून क्वारंटाईन केले आहे. त्रिमूर्ती नगर दाटीवाटीचा परिसर असल्याने काळजी पालिकेच्या वतीने घेण्यात येत आहे. पालिकेच्या वैद्यकीय पथकाच्या वतीने संपर्कातील व्यक्तींंच्या तपासणी करुन चाचणी करण्यात येईल असे प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी सांगितले.