महावितरण व वीज ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ठकसेना विरोधात गुन्हा दाखल

कल्याण पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर राठोड आणि वित्त व लेखा विभागाचे उप व्यवस्थापक गजानन राठोड यांना साहिल पटेल याने विविध ग्राहकांच्या वीजबिलसाठी दिलेले धनादेश न वटल्याने संशय आला. त्यामुळे संबंधित ग्राहकांना प्रत्यक्ष कार्यालयात बोलावून राठोड यांनी चौकशी केली असता धक्कादायक बाब उघडकीस आली.

    कल्याण : वीजबिल कमी करण्याचे आमिष दाखवून वीज ग्राहकांकडून रोख रक्कम स्वीकारायची आणि स्वतःच्या रक्कम शिल्लक नसलेल्या बँक खात्याचा धनादेश महावितरणकडे जमा करून महावितरण व ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका ठकसेना विरुद्धात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. साहिल अझगर पटेल (रा. बिस्मिल्ला हॉटेलजवळ, मौलबी चौक, गोविंदवाडी, कल्याण पश्चिम) असे या भामट्याने नाव असून त्याने एकूण २३ ग्राहक व महावितरणची २ लाख ४० हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल असून तपासात फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

    कल्याण पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर राठोड आणि वित्त व लेखा विभागाचे उप व्यवस्थापक गजानन राठोड यांना साहिल पटेल याने विविध ग्राहकांच्या वीजबिलसाठी दिलेले धनादेश न वटल्याने संशय आला. त्यामुळे संबंधित ग्राहकांना प्रत्यक्ष कार्यालयात बोलावून राठोड यांनी चौकशी केली असता धक्कादायक बाब उघडकीस आली. परिमंडल कार्यालयाच्या परिसरातील दोन, तहसील कार्यालयासमोरील एक व शिवाजी चौकातील एक अशा विविध पतसंस्थांच्या चार बिल भरणा केंद्रात येणाऱ्या ग्राहकांना वीजबिल कमी करून देण्याचा बहाणा करून आरोपीने या ग्राहकांकडून रोख रक्कम घेतली.

    ही रक्कम हडप करून आरोपीने संबंधित ग्राहकांच्या वीज बिलापोटी स्वतःचा आयसीआयसीआय या रक्कम शिल्लक नसलेल्या बँकेचा धनादेश बिल भरणा केंद्रात जमा करून ग्राहकांना त्याची पावती दिली. परंतु हे धनादेश न वटल्याने कल्याण पश्चिम विभाग कार्यालयात परत आले आणि आरोपीचा कारस्थान उघडकीस आले. उप व्यवस्थापक गजानन राठोड यांच्या फिर्यादीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात साहिल पटेल विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मीटर रीडिंग, ग्राहक वर्गवारी अथवा वीजभार यासंदर्भात चुकीची नोंद झाली असेल तरच महावितरणच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडून वीजबिल दुरुस्त केले जाते. इतर कोणालाही वीजबिलात दुरुस्तीचा अधिकार नाही. त्यामुळे वीज ग्राहकांनी वीजबिल कमी करून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या कोणत्याही घटकाच्या आमिषाला बळी न पडण्याची दक्षता घ्यावी व फसवणूक टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. अशाच प्रकारच्या फसवणुकीबाबत १५ मार्च रोजी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दीपक महादेवप्रसाद श्रीवास्तव (रा. उल्हासनगर कॅम्प ३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

    या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत वीजबिलाचा भरणा डिजिटल माध्यमातून ऑनलाईन किंवा महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्रातच करावा व छापील भरणा पावती घ्यावी. वीजबिल भरणा करण्याबाबत महावितरणबाह्य कोणत्याही व्यक्ती अथवा घटकांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.