अखेर ‘संक्रांती’नंतर कोपरी पुलाच्या गर्डरला मिळाला मुहूर्त

ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या ठाण्यातील कोपरी पुलाच्या गर्डरच्या कामाला मुहूर्त मिळाला असून, एकप्रकारे या कामाला नववर्ष उजाडले आहे. संक्रातीनंतर पुलाच्या गर्डर बसवण्यासाठी मुहूर्त लाभला असून आता फक्त ठाणेकरांना आणखी काही दिवस नव्या पुलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. एकीकडे डोंबिवली येथील पत्रीपुलाचे काम मार्गी लागले असताना ठाण्यातील एकमेव असलेल्या कोपरी पुलावर गर्डर टाकण्यास विलंब लागत आहे अशी बातमी दैनिक नवराष्ट्रने ४ तारखेला प्रसिद्ध केली होती.

त्यानंतर येत्या शनिवारी दिनांक १६ व रविवार दिनांक १७ या दोन दिवशी आनंदनगर येथील भुयारी मार्गावरील ३५ मीटरच्या ७ गर्डरचे काम एमएमआरडीए मार्फत सुरू होणार आहे. त्यानंतर दिनांक २४ व दिनांक २५ या दोन दिवशीच्या रात्री रेल्वे मार्फत ६५ मीटरच्या ७ गर्डर टाकण्याचे काम सुरू होणार आहे.

खासदार राजन विचारे यांनी १८ नोव्हेंबर २०२० रोजी कोपरी पुलाच्या कामाची पाहणी रेल्वे, एम एम आर डी ए व वाहतूक शाखेचे अधिकारी यांच्यासमवेत केली. या पाहणी दौऱ्यात खासदार राजन विचारे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कोपरी पुलाचे गर्डरचे काम डिसेंबर शेवटपर्यंत टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु तांत्रिक अडचणीमुळे रेल्वेने दिनांक २४ व २५ या दोन दिवसाच्या रात्री गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्याचे आदेश रेल्वेला प्राप्त झाले आहेत.

या गर्डर टाकण्याच्या कामासाठी वाहतूक शाखेकडून परवानगी प्राप्त झाली नसल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून खासदार राजन विचारे यांना कळविण्यात आले होते. खासदार राजन विचारे यांनी तात्काळ वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करून या कोपरी पुलाच्या गर्डर कामास आपण परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात आली होती. त्यांनी सुद्धा या कामाला गती देऊन ती तात्काळ रेल्वेला मिळवून दिली. दोन टप्यात हे गर्डर बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होणार आहे.

ठाणेकरांना दिलेले आश्वासन आणि स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून वाहतूक शाखेकडून काही बदल करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

राजन विचारे ( खासदार, ठाणे लोकसभा )