dombivali fire

शक्ती प्रोसेसिंग ॲन्ड डाईंग(shakti dying company) या कापडावर प्रोसेसिंग करणाऱ्या डोंबिवली एमआयडीसीच्या फेज १ मधील कंपनीला आज संध्याकाळी अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांच्या कापडाचा माल भस्मसात झाला. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

डोंबिवली : शक्ती प्रोसेसिंग ॲन्ड डाईंग(shakti dying company) या कापडावर प्रोसेसिंग करणाऱ्या डोंबिवली एमआयडीसीच्या फेज १ मधील कंपनीला आज संध्याकाळी अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांच्या कापडाचा माल भस्मसात झाला. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कल्याण रोडला असलेल्या या कंपनीला सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक आग लागली. या कंपनीला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. मात्र आग लागताच तेथिल मेंटेनन्सचे काम करणाऱ्या कामगारांनी कंपनीबाहेर पळ काढला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या लागोपाठ ५ बंबगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.चार मजली असलेल्या या कंपनीत आग धुमसत असल्याने पाण्याचा मारा करूनही उपयोग होत नव्हता. अखेर प्रेशर देणाऱ्या खास बंबाने मारा केल्यानंतर धुमसणाऱ्या आगीवर कसेबसे नियंत्रण येऊ शकले. इलेक्ट्रिक शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली असावी, असा प्रथम अंदाज बांधला जात आहे. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसून वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली. या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. तेथिल एका मशीनमध्ये स्पार्क होताच जवळच असलेल्या कापडाच्या गठड्यांनी पेट घेतला. प्रसंगावधान राखून कामगारांनी कंपनीबाहेर पळ काढला. त्यामुळे कामगार थोडक्यात बचावल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मात्र पेटलेल्या गठड्यांमुळे भडकलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आसपासच्या भागावर पाण्याचा मारा करून संभाव्य दुर्घटनेवर प्रथम नियंत्रण आणले. त्यामुळे आग इतरत्र पसरू शकली नाही. या घटनेची माहिती कळताच एमआयडीसी, पोलिस, औद्योगिक सुरक्षा विभाग, कामा संघटनेचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र तोपर्यंत संपूर्ण कंपनी आगीच्या भडक्याने कोळशात रुपांतरीत झाली.