अंबरनाथमधील बिस्कीट कंपनीला भीषण आग ; आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थिचे प्रयत्न

अंबरनाथमध्ये एमआयडीसीमधील आर के वन नावाच्या बिस्कीट कंपनीला भीषण आग लागली. त्यानंतर धुराचे लोट हे दोन ते तीन किमीच्या अंतरावर पसरले होते. त्यामुळे येथील परिसरात एकच भितीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. परंतु आग लागल्यावर सर्व कामगार कंपनीच्या बाहेर पडले. सुदैवाने यामध्ये कोणतीही प्राणहानी झाली नाही.

    अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये बिस्कीट कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (गुरूवार) सकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली. कंपनीला आग लागल्यावर धूराचे लोट दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर पसरले होते. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली असता, अग्निशमन दलाच्या एकूण ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांच्याकडून शर्थिचे प्रयत्न सुरू आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमध्ये एमआयडीसीमधील आर के वन नावाच्या बिस्कीट कंपनीला भीषण आग लागली. त्यानंतर धुराचे लोट हे दोन ते तीन किमीच्या अंतरावर पसरले होते. त्यामुळे येथील परिसरात एकच भितीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. परंतु आग लागल्यावर सर्व कामगार कंपनीच्या बाहेर पडले. सुदैवाने यामध्ये कोणतीही प्राणहानी झाली नाही. आग मोठी असल्याने बघ्यांची एकच गर्दी जमली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी नियंत्रणात आणली. मात्र, कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही अस्पष्ट आहे.

    दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच शहापूरमधील वेहलोळी गावात प्लॅस्टिक कंपनीला भीषण आग लागली होती. यामध्ये कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु ही घटना ताजी असतानाच आज अंबरनाथमध्ये बिस्कीट कंपनीला आग लागली आहे. त्यामुळे ठाण्यात अग्नितांडव सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.